अंबाजोगाई : येथील स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयातील वसतिगृह इमारतीच्या दुसऱ्या मजल्याच्या गच्चीवरून तोल जाऊन पडल्याने एमबीबीएसचा विद्यार्थी गंभीर जखमी झाला. बुधवारी रात्री ही घटना घडली. गगन सुरजभान सिंगला (वय २१, रा. पंजाब) असे त्या विद्यार्थ्याचे नाव आहे.
गगन सध्या एमबीबीएसच्या अंतिम वर्षात शिकत असून तो स्वाराती वैद्यकीय महाविद्यालय परिसरातील कोंढाणा वसतिगृहात राहतो. बुधवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास तो वसतिगृहाच्या गच्चीवर कानात हेडफोन लावून गाणे ऐकत शतपावली करत होता. यावेळी अंधाऱ्या भागात तो कठड्याजवळ आला असता अचानक तोल गेल्याने तो खाली पडला आणि जबर जखमी झाला. इतर विद्यार्थ्यांनी त्याला तातडीने स्वाराती रूग्णालयात दाखल केले. गगनची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. दरम्यान, या दुर्घटनेची माहिती गगनच्या पालकांना देण्यात आली असल्याचे संबंधितांनी सांगितले.