टीम AM : अंबाजोगाई तालुक्यातील राडी गावात एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. गुरुराज सिद्धेश्वर कोळगिरे (वय – 18) या विद्यार्थ्याने टोकाचे पाऊल उचलत आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी (दि. 7) सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे राडी गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
मयत गुरुराज कोळगिरे हा विद्यार्थी सध्या लातूर येथील शिक्षण संस्थेत इयत्ता बारावीमध्ये शिक्षण घेत होता. काही दिवसांपूर्वी तो गावी राडी येथे आला होता. आज सकाळी 9.30 वाजण्याच्या आधी, त्याने घरातील अभ्यासाच्या खोलीत छताच्या हुकाला दोरीने गळफास लावून आत्महत्या केली.
आत्महत्येमागचे कारण अद्याप अस्पष्ट असून, कोणत्यातरी अज्ञात कारणामुळे त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घटनेची माहिती मिळताच अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलीस या घटनेचा पुढील तपास करीत आहेत.