टीम AM : अंबाजोगाई येथील सहाय्यक निबंधक कार्यालयातील सहकार अधिकारी संतोष भंडारी यांना 25 हजार रुपयांची लाच स्वीकारताना जालना येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने सोमवारी दुपारी रंगेहात पकडले. पतसंस्थेविरोधातील तक्रारी निकाली काढण्यासाठी त्यांनी 50 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचा आरोप आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित पतसंस्थेविरोधात दाखल तक्रारींचे निवारण करण्याच्या बदल्यात भंडारी यांनी संस्थेच्या सचिवाकडे 50 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. या प्रकरणी सचिवांनी जालना येथील ‘एसीबी’ कार्यालयात रीतसर तक्रार दाखल केली होती.
तक्रारीची शहानिशा केल्यानंतर ‘एसीबी’ च्या पथकाने सोमवारी दुपारी अंबाजोगाई येथील सहाय्यक निबंधक कार्यालयात सापळा रचला. लाचेच्या एकूण 50 हजार रुपयांपैकी पहिला हप्ता म्हणून 25 हजार रुपये स्वीकारण्याचे ठरले होते. ही रक्कम स्वीकारत असताना ‘एसीबी’ च्या पथकाने संतोष भंडारी यांना रंगेहात ताब्यात घेतले. या कारवाईनंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून भंडारी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. तपास पूर्ण झाल्यानंतर अधिक तपशील समोर येणार असल्याचे ‘एसीबी’ च्या सूत्रांनी सांगितले.



