‘स्वाराती’ त रुग्णांची हेळसांड : औषधांचा तुटवडा, तपासण्यांचा भार, गरीब रुग्णांनी जायचे तरी कुठे ?

टीम AM : अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय (स्वाराती) विविध समस्यांच्या विळख्यात सापडले आहे. वृद्ध रुग्णांच्या दृष्टीवर परिणाम झाल्याच्या प्रकरणाची चर्चा ताजी असतानाच आता रुग्णालयात आवश्यक औषधांचाही तुटवडा असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. गरीब आणि सर्वसामान्य रुग्णांना उपचारासाठी आवश्यक औषधेही उपलब्ध होत नसतील, तर त्यांनी जायचे तरी कुठे ? असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महाराष्ट्र युवती अध्यक्षा अमृता काळदाते – लोमटे यांनी या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधले आहे. यापूर्वी त्यांनी ‘स्वाराती’ रुग्णालयातील सोनोग्राफी सुविधेचा प्रश्न उपस्थित केला होता. त्यानंतर आता औषधांच्या तुटवड्याबाबत तक्रारी समोर आल्यानंतर त्यांनी स्वतः रुग्णालयाला भेट देत रुग्णांशी संवाद साधून परिस्थितीची माहिती घेतली. यावेळी आवश्यक औषधांचा अपुरा साठा असल्याच्या तक्रारी रुग्णांनी मांडल्याचे त्यांनी सांगितले.

दररोज जवळपास तीन हजार रुग्ण बाह्यरुग्ण विभागात (ओपीडी) उपचारासाठी येत असताना रक्तदाब, मधुमेह तसेच हाडांच्या आजारांवरील मूलभूत औषधेही पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्याच्या तक्रारी आहेत. एवढेच नव्हे, तर रक्त तपासण्यांसाठीही रुग्णांना खासगी प्रयोगशाळांचा आधार घ्यावा लागत असल्याचे समोर आले आहे. शासकीय रुग्णालयात मोफत किंवा माफक दरात उपचार मिळण्याच्या अपेक्षेने येणाऱ्या गरीब रुग्णांवर बाहेरून औषधे खरेदी करण्याची आणि तपासण्यांसाठी पैसे खर्च करण्याची वेळ येत आहे.

एकीकडे अत्याधुनिक वैद्यकीय सुविधांच्या घोषणा होत असताना दुसरीकडे रुग्णांना मूलभूत औषधे आणि तपासण्यांसाठीही अडचणींचा सामना करावा लागत असेल, तर ही बाब अत्यंत गंभीर आहे. रुग्णालय प्रशासनाने औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध करून देण्यासह रक्त तपासणी आणि इतर आरोग्य सुविधांमधील अडचणी तातडीने दूर कराव्यात. गरीब जनतेच्या आरोग्याशी खेळू नका, असा इशाराही अमृता काळदाते – लोमटे यांनी दिला आहे.

‘स्वाराती’ सारख्या मोठ्या शासकीय रुग्णालयातच आरोग्य सुविधांचा अभाव असेल, तर सर्वसामान्य आणि गरीब रुग्णांनी उपचारासाठी कोणाकडे धाव घ्यायची ? हा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here