अंबाजोगाई तालुका पत्रकार संघाचा राज्यस्तरीय ‘मूकनायक’ पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार तुळशीदास भोईटे यांना प्रदान

प्रसिद्धीसाठी विखारी वक्तव्ये करून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न होत आहे – तुळशीदास भोईटे

टीम AM : अंबाजोगाई तालुका पत्रकार संघाच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय ‘मूकनायक’ पुरस्कार – 2026 हा राज्यातील नामवंत ज्येष्ठ पत्रकार व संपादक तुळशीदास भोईटे यांना शुक्रवार दि. 30 जानेवारी रोजी अंबाजोगाई येथे मान्यवरांच्या हस्ते दिमाखदार सोहळ्यात प्रदान करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अंबाजोगाई पीपल्स बँकेचे चेअरमन राजकिशोर (पापा) मोदी हे होते. प्रमुख अतिथी म्हणून केज विधानसभा मतदारसंघाचे युवानेते अक्षय मुंदडा उपस्थित होते. यावेळी अंबाजोगाई तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष महादेव गोरे, पदाधिकारी व पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुरस्कार स्वीकारल्यानंतर बोलताना तुळशीदास भोईटे म्हणाले की, ग्रामीण पत्रकार हे अत्यंत तळमळीने समाजाचे प्रश्न मांडण्याचे कार्य करतात. मात्र, काही अपवादांमुळे संपूर्ण पत्रकार वर्गाला हिणवले जाते, हे चुकीचे आहे. आज माध्यम क्षेत्रात अतिरेक वाढत असला तरी अनेक पत्रकार प्रामाणिकपणे, निष्ठेने आपले कर्तव्य बजावत आहेत. अशा पत्रकारांच्या योगदानाकडे दुर्लक्ष होऊ नये, असे त्यांनी स्पष्ट केले.

सध्याच्या राजकीय वातावरणावर भाष्य करताना भोईटे म्हणाले की, प्रसिद्धीसाठी विखारी वक्तव्ये करून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र, अंबाजोगाईतील नेत्यांनी सकारात्मक व संतुलित भूमिका घेतल्यामुळे शहराची वेगळी ओळख निर्माण झाली आहे, हे कौतुकास्पद आहे.

यावेळी युवानेते अक्षय मुंदडा यांनी पत्रकार हा समाजाचा महत्त्वाचा घटक असून पत्रकारांच्या हितासाठी आमदार नमिता मुंदडा व नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा यांच्या माध्यमातून पत्रकार भवनासाठी जागा व निधी उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती दिली. माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी यांनीही पत्रकार बांधवांच्या उपक्रमांना कायम पाठबळ देण्याची ग्वाही दिली.

कार्यक्रमाच्या प्रारंभी ‘मूकनायक’ दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. तसेच दिवंगत संघराज यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. याप्रसंगी अंबाजोगाई शहर व तालुक्यातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा उपस्थितांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यामध्ये डॉ. ज्ञानोबा दराडे, डॉ. एकनाथ शेळके, डॉ. सुनिता तोंडगे, डॉ. नितीन चाटे, ॲड. सुनिल सौंदरमल, ऋतुजा दशरथ वेडे, अर्पिता राजीव शिंदे, वैष्णवी सुभाष दुभाशे, कल्पेश बालाजी जाधव, आदिशक्ती स्वयंसहाय्यता महिला बचत गट, रुपक लोंढे (आंतराष्ट्रीय ड्रम वादक) जागृती माणिक हारे यांचा समावेश होता. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक महादेव गोरे यांनी केले. सूत्रसंचालन परमेश्वर गित्ते यांनी तर आभार प्रदर्शन सचिव गणेश जाधव यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अंबाजोगाई तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष महादेव गोरे, सचिव गणेश जाधव तसेच संघाचे सदस्य जगन सरवदे, प्रा. प्रदीप तरकसे, परमेश्वर गित्ते, दादासाहेब कसबे, रोहिदास हतागळे, संभाजी मस्के, धनंजय जाधव, विश्वजीत गंडले, दत्ता वालेकर, प्रविण कुरकूट, रवी अरसुडे, रतन मोती यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here