टीम AM : घरासाठी दरवाजे, खिडक्या किंवा आकर्षक फर्निचर बनवायचे असेल, तर सागवान लाकडाला आजही विशेष पसंती दिली जाते. मात्र बाजारात अस्सल सागवान ओळखणे आणि योग्य दरात दर्जेदार लाकूड मिळवणे हे ग्राहकांसमोरील मोठे आव्हान आहे. याच पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्ह्यातील अल्लापल्ली येथील वन विकास महामंडळाने ग्राहकांसाठी सागवान खरेदीची चांगली सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
गडचिरोलीच्या जंगलात वाढणारे सागवान आपल्या नैसर्गिक गुणवत्ता, वजन, आकर्षक चमक आणि टिकाऊपणासाठी ओळखले जाते. या लाकडाचा वापर अयोध्येतील राम मंदिरातील गाभाऱ्याच्या लाकडी कामासाठी तसेच नवीन संसद भवनातील लोकसभा आणि राज्यसभा सभागृहातील खुर्च्यांसाठी करण्यात आल्याची माहिती वन विकास महामंडळाचे प्रतिनिधी एस. कुमार भोयर यांनी दिली. गडचिरोलीच्या सागवानाला देशातील प्रतिष्ठित वास्तूंमध्ये स्थान मिळणे ही जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे. या लाकडाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याचा नैसर्गिक रंग आणि चमक. अतिरिक्त पॉलिश न करताही लाकडाचा पोत आकर्षक दिसतो. योग्य प्रक्रिया आणि देखभाल केल्यास हे लाकूड दीर्घकाळ टिकते. त्यामुळे घराचे दरवाजे, खिडक्या, फर्निचर आणि इतर लाकडी कामांसाठी हे सागवान उपयुक्त ठरते.
अल्लापल्ली येथील वन विकास महामंडळाच्या शासकीय डेपोमध्ये ग्राहकांना स्वतः जाऊन लाकूड पाहण्याची आणि पसंत करण्याची सुविधा आहे. ग्राहकांनी सांगितलेल्या मापानुसार लाकडाची कटाई करून दिली जाते. लाकडाच्या प्रकारानुसार आणि आकारानुसार साधारण 800 रुपयांपासून 17 हजार रुपयांपर्यंत प्रतिघनफूट दर असल्याची माहिती देण्यात आली आहे. वाहतुकीची व्यवस्था, आवश्यक कागदपत्रे आणि ट्रान्झिट परमिटसह ग्राहकांपर्यंत माल पोहोचवण्याची सुविधाही उपलब्ध आहे. विशेष म्हणजे आता वन विकास महामंडळाकडून केवळ सागवान लाकूड विक्री न करता त्यापासून तयार केलेले फर्निचरही ग्राहकांना उपलब्ध करून देण्याची तयारी सुरू आहे. येत्या दोन ते चार महिन्यांत फर्निचर विक्री सुरू करण्याचे नियोजन असल्याची माहिती मुलाखतीत देण्यात आली.
ग्राहकांच्या मागणीनुसार फर्निचर तयार करून ते घरपोच पोहोचवण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याचा विभागाचा मानस आहे. त्यामुळे भविष्यात ग्राहकांना अस्सल गडचिरोली सागवानापासून तयार झालेले फर्निचरही थेट शासकीय यंत्रणेमार्फत खरेदी करता येईल. याशिवाय सागवान लागवड करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांसाठीही वन विकास महामंडळाकडून रोपे उपलब्ध करून दिली जातात. रोपांचे बुकिंग, लागवडीची पद्धत आणि झाडांची देखभाल याबाबत वन विभागाचे कर्मचारी मार्गदर्शन करतात. अस्सल सागवानाची खात्री, शासकीय विक्री व्यवस्था, आवश्यक कागदपत्रे आणि भविष्यात घरपोच फर्निचरची सुविधा अशा अनेक गोष्टींमुळे अल्लापल्लीच्या सागवानाकडे ग्राहकांचे लक्ष वेधले जात आहे. जंगलातील मौल्यवान लाकूड थेट ग्राहकांच्या घरापर्यंत पोहोचवण्याच्या या उपक्रमामुळे गडचिरोलीच्या वनसंपत्तीला नवी ओळख मिळत आहे.



