टीम AM : सायगाव जवळ रात्रीच्या सुमारास अज्ञात वाहनाने मोटारसायकलला जोराची धडक दिल्याने भीषण अपघात होऊन एका युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. अपघातात मृत्यू झालेल्या युवकाचे नाव रत्नदिप भिमराव गजधने (रा. रामेश्वर जि. लातूर) असे आहे.
अपघाताची माहिती मिळताच जखमी युवकाला उपचारासाठी रुग्णालयात नेण्याकरिता रुग्णवाहिकेला पाचारण करण्यात आले. मात्र, रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचण्यास तब्बल पाऊण तास उशीर झाल्याचा आरोप उपस्थित नागरिक आणि नातेवाईकांनी केला आहे. अपघातानंतर मदतीची गरज असताना रुग्णवाहिका वेळेत उपलब्ध न झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिकाच वेळेवर पोहोचत नसेल, तर सर्वसामान्य नागरिकांनी मदत कोणाकडे मागायची ? असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर रुग्णवाहिका सेवेच्या तत्परतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. या घटनेचा अधिक तपास पोलीस करित आहेत.



