दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अंबाजोगाई उपप्रादेशिक परिवहन विभाग ॲक्शन मोडमध्ये ; नियम मोडणाऱ्या वाहनधारकांना दणका…!

21 वाहनांची तपासणी, तब्बल 50 हजारांचा दंड वसूल

टीम AM : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची सुरक्षितता आणि वाहतुकीच्या नियमांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, अंबाजोगाई यांच्या वतीने विशेष तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे. सणासुदीच्या काळात प्रवाशांकडून अवाजवी भाडे आकारणाऱ्या वाहनधारकांना, परराज्यात नोंदणी असलेल्या प्रवासी वाहनांना तसेच प्रवासी बसमधून नियमबाह्य मालवाहतूक करणाऱ्यांना या मोहिमेतून लक्ष्य करण्यात येत आहे.

या विशेष मोहिमेद्वारे परिवहन विभागाने नियमभंग करणाऱ्यांविरोधात कठोर भूमिका घेतली असून, काल एकाच दिवशी तब्बल 21 वाहनांची तपासणी करण्यात आली. या कारवाईत 50 हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. त्यामुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांचे धाबे दणाणले आहेत.

दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. याच संधीचा गैरफायदा घेत काही वाहनधारकांकडून जादा भाडे आकारले जाण्याची शक्यता असते. तसेच प्रवासी बसमधून मालवाहतूक करणे आणि वाहनांच्या कागदपत्रांबाबत अनियमितता आढळण्याच्या पार्श्वभूमीवर परिवहन विभागाने तपासणीचा धडाका सुरू केला आहे. वाहनांची कागदपत्रे, प्रवासी वाहतुकीचे नियम आणि रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक बाबींची तपासणी केली जात आहे.

या तपासणी मोहिमेत परिवहन अधिकारी विजय सिंह भोसले, निलेश पाटील, शुभम लवळे तसेच चालक महादेव फड आणि मुश्ताक मोमीन कार्यरत आहेत.

प्रवाशांची सुरक्षितता, नियमबद्ध वाहतूक आणि अवाजवी भाडे आकारणीला आळा घालण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय अंबाजोगाईने सुरू केलेली ही मोहीम महत्त्वपूर्ण ठरत आहे. सणासुदीच्या काळात प्रवाशांची आर्थिक लूट आणि वाहतुकीतील बेशिस्त रोखण्यासाठी परिवहन विभागाची ही धडक कारवाई निश्चितच स्वागतार्ह आहे.

नियम पाळा, सुरक्षित प्रवास करा; प्रवाशांच्या सुरक्षिततेशी तडजोड करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा स्पष्ट संदेश या कारवाईतून मिळत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here