टीम AM : वरदा तिमांडे आणि तिच्या धाकट्या भावाने आपल्या गुल्लकात साठवलेले ₹ 3,575 महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी दिले. आपल्या साठवलेल्या पैशांमुळे कोणाच्या तरी चेहऱ्यावर थोडंसं हास्य उमटावं, एवढीच वरदाची अपेक्षा होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे त्यांनी ही मदत सुपूर्द केली.
या दोघा भावंडांनी थोडेथोडे पैसे जमवून ही रक्कम साठवली होती. मात्र, महाराष्ट्रातील दुष्काळाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांविषयी कळल्यावर स्वतःसाठी खर्च करण्याऐवजी त्यांनी हे पैसे शेतकऱ्यांच्या मदतीसाठी देण्याचा निर्णय घेतला.
एका शेतकऱ्यासाठी दुष्काळ म्हणजे हातची पिके जाणे, वर्षभराच्या कष्टांवर पाणी फिरणे, उत्पन्न बुडणे आणि पुढे काय होणार, याची चिंता. पण वरदासाठी या सगळ्याचा अर्थ इतकाच होता की, काही माणसे अडचणीत आहेत आणि त्यांच्यासाठी आपणही काहीतरी करू शकतो.
वरदाच्या बोलण्यातली सर्वांत सुंदर गोष्ट म्हणजे त्यामागचा निरागसपणा ! संकट किती मोठे आहे किंवा आपली मदत कितपत पुरेल, याचा ती विचार करत नाही. ती फक्त अडचणीत असलेल्या माणसांचा विचार करते आणि आपल्या छोट्याशा मदतीने त्यांच्या चेहऱ्यावर थोडा आनंद फुलावा, एवढीच तिची इच्छा आहे.
या ₹ 3,575 मुळे दुष्काळाचे संकट दूर होणार नाही. पण या छोट्याशा मदतीमागचा विचार मात्र पैशांपेक्षाही कितीतरी मोठा आहे. कारण कुठेतरी कोणीतरी अडचणीत आहे, याची जाणीव ठेवून त्यांच्यासाठी मदतीचा हात पुढे करणारी माणसेही आहेत.



