अंबाजोगाईत‌ अतिक्रमणांवर फिरला जेसीबी : तगडा पोलिस बंदोबस्त…!

टीम AM : अंबाजोगाई शहरातील अतिक्रमण हटाव मोहीम आज दिनांक 30 आक्टोबर शुक्रवार पुन्हा सुरु करण्यात आली आहे. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून सार्वजनिक बांधकाम विभागाने ही मोहीम हाती घेतली. सदरबाजार चौकातील बहुतांश अतिक्रमणे आज काढण्यात आली. दरम्यान,  सार्वजनिक बांधकाम विभागाने गेल्या काही दिवसांपासून शहरातील अतिक्रमणे काढण्यात येतील, अशा आशयाची सूचना केली होती. परंतू, या सुचनेकडे‌ काही जणांनी दुर्लक्ष केले. आज अतिक्रमण हटाव मोहिमेत बऱ्याच जणांच्या दुकानावर आणि घरांवर जेसीबी फिरवण्यात आला.

अंबाजोगाई शहरातील संत भगवानबाबा चौक ते यशवंतराव चव्हाण चौक तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौक ते – ‘स्वाराती’ रुग्णालय – यशवंतराव चव्हाण चौक या मुख्य रस्त्याचे रुंदीकरण होणार आहे. यासाठी तब्बल 42 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या रस्त्याचे काम सुरु करण्यासाठी अतिक्रमणांचा अडथळा सार्वजनिक बांधकाम विभागाला होत होता. त्यामुळे गेल्या कित्येक दिवसांपासून शहरातील अतिक्रमणे पुन्हा काढली जाणार आहेत, अशी चर्चा होती. त्याला दिवाळीपूर्वी मुहूर्त सापडला आणि शहरातील अतिक्रमणे काढण्यास सुरुवात झाली. आजपासून शहरात ही मोहीम वेगाने सुरू झाली.

तगडा पोलिस बंदोबस्त

शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील आणि सदरबाजार परिसरातील अतिक्रमणे काढताना तगडा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सार्वजनिक बांधकाम विभागाची पुर्ण टीम या ठिकाणी हजर राहून अतिक्रमणे काढत होती. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, कर्मचारी हजर होते. अतिक्रमणे काढताना बघ्यांची गर्दी मोठ्या प्रमाणात होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here