टीम AM : गुटखा आणि पानमसाल्याचे सेवन आरोग्यासाठी घातक असल्याचे वारंवार सांगितले जाते. मात्र, मध्य प्रदेशातील गंजबासौदा येथे गुटखा थुंकण्याच्या प्रयत्नात एका 65 वर्षीय व्यक्तीला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्रभू लाल गुप्ता असे मृत व्यक्तीचे नाव आहे. गुटखा थुंकताना त्यांची पिंक जवळून जाणाऱ्या 11 हजार व्होल्टच्या उच्चदाबाच्या वीजवाहिनीच्या संपर्कात आल्याने त्यांना विजेचा तीव्र धक्का बसला.
मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी सुमारे एक वाजण्याच्या सुमारास प्रभू लाल गुप्ता हे घराच्या बाल्कनीतून गुटखा थुंकण्यासाठी बाहेर वाकले होते. यावेळी त्यांच्या तोंडातून पडलेली पिंक जवळून जाणाऱ्या उच्चदाबाच्या वीजवाहिनीच्या संपर्कात आली. त्यामुळे त्यांना विजेचा जोरदार धक्का बसला. या दुर्घटनेत त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, निवासी इमारतींच्या इतक्या जवळून उच्चदाबाची वीजवाहिनी कशी नेण्यात आली, असा प्रश्न उपस्थित होत आहे. संबंधित वीजवाहिनी अन्यत्र हलविण्याबाबत यापूर्वी तक्रारी करूनही कार्यवाही झाली नसल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांनी केला आहे. त्यामुळे वीज विभागाच्या कारभाराबाबतही नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
गुटखा थुंकण्याच्या क्षुल्लक कृतीतून घडलेल्या या दुर्घटनेने सर्वांचे लक्ष वेधले आहे. मात्र, या घटनेच्या निमित्ताने निवासी भागातील उच्चदाबाच्या वीजवाहिन्यांची सुरक्षितता आणि संभाव्य धोके यांचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.
बातमीसाठी वापरलेले छायाचित्र प्रातिनिधिक आहे…!



