टीम AM : अंबाजोगाई शहराच्या वैभवात लवकरच आणखी भर पडणार आहे. शहरातील प्रमुख रस्त्यावर आकर्षक ‘डेकोरेटिव्ह पोल’ बसविण्यात येणार असून, यामुळे रात्रीच्या वेळी शहर लखलखत्या दिव्यांनी उजळून निघणार आहे. या कामासाठी नगरपरिषदेने पुढाकार घेतला आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते ‘स्वाराती’ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयापर्यंतच्या रस्त्यावर आणि छत्रपती शिवाजी महाराज चौक ते योगेश्वरी देवी मंदिराच्या रस्त्यावर हे ‘डेकोरेटिव्ह पोल’ उभारण्यात येणार आहेत. आकर्षक विद्युत रोषणाईमुळे या प्रमुख मार्गाच्या सौंदर्यात भर पडण्यासोबतच शहराच्या वैभवातही वाढ होणार आहे.
विधानपरिषद निवडणूकीची आचारसंहिता संपल्यानंतर लगेचच या कामाला प्रत्यक्ष सुरुवात होणार असल्याची माहिती अधिकृत सूत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे शहरातील प्रमुख रस्त्याला आकर्षक स्वरूप मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
अंबाजोगाई शहराच्या सौंदर्यीकरणाच्या दृष्टीने नगरपरिषदेचा हा पुढाकार महत्त्वपूर्ण मानला जात असून, प्रत्यक्ष काम कधी सुरू होते आणि हे ‘डेकोरेटिव्ह पोल’ शहराच्या सौंदर्यात किती भर घालतात, याकडे अंबाजोगाईकरांचे लक्ष लागले आहे.



