टीम AM : तहसील कार्यालयात वडिलांना नीट वागणूक मिळत नव्हती, त्याच कार्यालयात लेकाने त्यांना सन्मानाने नेलं ! धाराशिव जिल्ह्यातील परांडा तालुक्यातल्या लाकीबुकी गावचे समाधान गायकवाड यांचा प्रवास संघर्ष आणि जिद्दीची प्रेरणादायी कहाणी आहे. त्यांचे वडील भास्करराव गायकवाड सालगडी म्हणून काम करत कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते.
घरची परिस्थिती हलाखीची, गावात शिक्षणाच्या मर्यादित सुविधा आणि घरात साधी वीजही नव्हती. मात्र, समाधान यांनी परिस्थितीसमोर हार मानली नाही.
गावात प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी पुढील शिक्षणासाठी बाहेर पडून दहावीत 87 टक्के गुण मिळवले. त्यानंतर अभियांत्रिकीचं शिक्षण पूर्ण केलं आणि नागरी सेवांचा ध्यास घेतला. UPSC मध्ये यश हुकल्यानंतरही त्यांनी प्रयत्न सोडले नाहीत. 2018 मध्ये तहसीलदार म्हणून निवड झाली, तर 2019 मध्ये MPSC परीक्षेत यश मिळवत उपजिल्हाधिकारी पद गाठलं.
वडिलांच्या कष्टांचं चीज करणाऱ्या समाधान यांच्या यशाने त्यांच्या कुटुंबासह गावाचाही अभिमान उंचावला आहे. त्यांच्या जिद्दीला मनापासून सलाम…!



