टीम AM : अंबाजोगाई शहरातील अतिक्रमण हटाव मोहीम आज दिनांक 31 आक्टोबर शनिवारी पुन्हा सुरु करण्यात आली आहे. शहरातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौकातून (मांडवा रोड) सार्वजनिक बांधकाम विभागाने ही मोहीम हाती घेतली. मांडवा रोडवरील बहुतांश अतिक्रमणे आज काढण्यात येत आहेत. दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाने गेल्या काही दिवसांपासून शहरातील अतिक्रमणे काढण्यात येतील, अशा आशयाची सूचना केली होती. परंतू, या सुचनेकडे काही जणांनी दुर्लक्ष केले. आजही अतिक्रमण हटाव मोहिमेत बऱ्याच जणांच्या दुकानावर आणि घरांवर जेसीबी फिरवण्यात आला.
अंबाजोगाई शहरातील संत भगवानबाबा चौक ते यशवंतराव चव्हाण चौक तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौक ते – ‘स्वाराती’ रुग्णालय – यशवंतराव चव्हाण चौक आणि मांडवा रोड या मुख्य रस्त्याचे रुंदीकरण होणार आहे. यासाठी तब्बल 42 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या रस्त्याचे काम सुरु करण्यासाठी अतिक्रमणांचा अडथळा सार्वजनिक बांधकाम विभागाला होत होता. त्यामुळे गेल्या कित्येक दिवसांपासून शहरातील अतिक्रमणे पुन्हा काढली जाणार आहेत, अशी चर्चा होती. त्याला दिवाळीपूर्वी मुहूर्त सापडला आणि शहरातील अतिक्रमणे काढण्यास सुरुवात झाली. कालपासून शहरात ही मोहीम वेगाने सुरू झाली आहे.
तगडा पोलिस बंदोबस्त
शहरातील मांडवा रोड परिसरातील अतिक्रमणे काढताना तगडा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सार्वजनिक बांधकाम विभागाची, ‘महावितरण’ ची पुर्ण टीम या ठिकाणी हजर राहून अतिक्रमणे काढत होती. अतिक्रमणे काढताना बघ्यांची गर्दी मोठ्या प्रमाणात होती.



