टीम AM : धुळे जिल्ह्यात औद्योगिक विकासाला नवी चालना देणारा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. रावेर औद्योगिक वसाहतीच्या विस्तारासाठी महसूल विभागाची 289 हेक्टर 69 आर (सुमारे 725 एकर) जमीन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला (एमआयडीसी) उपलब्ध करून देण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. राज्यातील विविध मतदारसंघात राज्य सरकार धडाकेबाज निर्णय घेत असून केज विधानसभा मतदारसंघात कायम उदासिनता दिसून येत आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून अंबाजोगाई ‘एमआयडिसी’ चा प्रश्न शासनदरबारी धूळखात पडला असून सत्ताधारी लोकप्रतिनिधींना तो सोडवण्यात अपयश येत आहे.
केज मतदार संघाच्या आमदार नमिता मुंदडा यांनी दोन्ही विधानसभा निवडणूकीत येथील बेरोजगार तरुणांना रोजगाराचे आश्वासन दिलं होतं. आमदार महोदयांनी ‘एमआयडिसी’ निर्माण करण्याचा शब्द दिला होता. त्यासाठी त्यांनी निवडणूकीत एक पत्र देखील सादर केले होते. त्या पत्राचं काय झालं ? त्यांनाचं माहित…परंतू, अंबाजोगाई शहरातील बेरोजगार युवकांना वाऱ्यांवर सोडल्याची भावना निर्माण झाली आहे.
तरुणांना ‘एमआयडीसी’ चे गाजर दाखविले जाते…!
अंबाजोगाईसाठी गेल्या अनेक वर्षांपासून ‘एमआयडीसी’ ची मागणी होत असताना, प्रत्यक्षात मात्र कोणतीही ठोस हालचाल होताना दिसत नाही. निवडणुका जवळ आल्या की, अंबाजोगाईतील तरुणांना ‘एमआयडीसी’ चे गाजर दाखविले जाते, परंतू, निवडणुका संपल्या की पुन्हा परिस्थिती ‘जैसे थे’ च राहते, अशा प्रतिक्रिया अंबाजोगाईत उमटत आहेत. विशेष म्हणजे, केज मतदारसंघाच्या आमदार नमिता मुंदडा यांची ही दुसरी टर्म सुरू आहे. मात्र, ‘एमआयडीसी’ च्या बाबतीत त्यांनी आतापर्यंत फक्त निवेदन देण्यापुरतीच भूमिका घेतल्याचा आरोप होत आहे. प्रत्यक्ष कामकाजात मात्र कोणतीही ठोस प्रगती दिसत नाही.
रावेरला शेकडो एकर जमीन ‘एमआयडीसी’ साठी उपलब्ध करून दिली जाते, मग अंबाजोगाईतील ‘एमआयडीसी’ चा प्रस्ताव नेमका कुठे अडकलाय ? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. परिणामी आता बेरोजगार तरुणांमध्ये अस्वस्थता वाढली असून, ‘आमदार महोदयां अंबाजोगाई ‘एमआयडीसी’ साठी खरोखर पाठपुरावा करणार की नाही ?’ असा सवाल जोर धरू लागला आहे.
दरम्यान, अंबाजोगाईसाठी ‘एमआयडीसी’ मंजूर झाल्यास हजारो युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, उद्योगांना चालना मिळेल आणि परिसराचा विकास वेगाने होईल. मात्र, राजकीय इच्छाशक्ती आणि पाठपुराव्याअभावी हा प्रश्न कायम रखडत असल्याची चर्चा जनतेमध्ये होत आहे.



