टीम AM : स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील नेत्र विभागात मोतीबिंदूची शस्त्रक्रिया झाल्यानंतर चार रुग्णांना दृष्टीदोषाचा त्रास जाणवू लागल्याची गंभीर घटना समोर आली होती. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली होती आणि घडलेल्या प्रकारामुळे रुग्णांच्या नातेवाइकांमध्ये चिंता व्यक्त केली जात होती. या घटनेची वरिष्ठ पातळीवर दखल घेण्यात आली असून जॉईंट डायरेक्टची एक समिती ‘स्वाराती’ रुग्णालयात दाखल झाली आहे. ही समिती झालेल्या घटनेची कसून चौकशी करत आहे, अशी माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळाली आहे. दरम्यान, ही समिती काय अहवाल देते आणि कोणाला दोषी ठरवते ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 16 ऑक्टोबर रोजी नेत्र तपासणीसाठी आलेल्या 25 रुग्णांवर 17 ऑक्टोबर रोजी शस्त्रक्रिया करण्यात आली. यापैकी 21 रुग्णांची प्रकृती व्यवस्थित असल्याचे सांगण्यात आले, तर चार रुग्णांना शस्त्रक्रियेनंतर दृष्टीसंबंधी अडचणी निर्माण झाल्या. बाधित रुग्णांमध्ये तीन महिला आणि एका पुरुषाचा समावेश असून, ते टाकळगाव आणि अंबाजोगाई परिसरातील आहेत.
रुग्णांना दृष्टीसंबंधी त्रास जाणवू लागल्यानंतर 18 ऑक्टोबर रोजी लातूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील नेत्रतज्ज्ञांना तपासणीसाठी बोलावण्यात आले. त्यानंतर चारही रुग्णांना 19 ऑक्टोबर रोजी पहाटे रुग्णवाहिकेतून जालना येथील ‘गणपती’ नेत्र रुग्णालयात पुढील उपचारासाठी हलवण्यात आले. तेथे सहा ते सात दिवस उपचार केल्यानंतर त्यांना पुन्हा ‘स्वाराती’ रुग्णालयात आणण्यात आले.
27 ऑक्टोबर रोजी या रुग्णांची पुन्हा तपासणी करण्यात आली. मात्र, त्यांच्या दृष्टीमध्ये सुधारणा होण्याबाबत डॉक्टरांनी कमी शक्यता व्यक्त केल्याने नातेवाइकांमध्ये नाराजी निर्माण झाल्याची माहिती आहे. रुग्णांची दृष्टी पूर्ववत व्हावी, अशी अपेक्षा नातेवाइकांकडून व्यक्त केली जात आहे.
घटना दुर्दैवी…!
दरम्यान, या घटनेचे नेमके कारण शोधण्यासाठी संबंधित दिवशी शस्त्रक्रिया गृहात उपस्थित असलेल्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आल्याचे नेत्र विभागप्रमुख डॉ. ज्ञानोबा दराडे यांनी सांगितले होते. ही घटना दुर्दैवी असून, तिचे नेमके कारण शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे दराडे यांनी सांगितले होते.



