टीम AM : अंबाजोगाई शहरातील रिक्षा व शालेय विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या व्हॅन चालकांची महत्त्वपूर्ण बैठक पोलीस ठाणे परिसरात पार पडली. या बैठकीत पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांनी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्याबाबत स्पष्ट सूचना दिल्या.
रिक्षा चालकांनी गणवेश परिधान करावा, शाळेतील विद्यार्थ्यांची वाहतूक करताना विशेष काळजी घ्यावी, क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांची वाहतूक करू नये, तसेच रिक्षा व व्हॅनची सर्व आवश्यक कागदपत्रे नेहमी स्वतःजवळ ठेवावीत, अशा सूचना त्यांनी दिल्या. विद्यार्थ्यांची वाहतूक करताना आवश्यक त्या सर्व सुरक्षा उपाययोजना राबविणे बंधनकारक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
तसेच रहदारीस अडथळा निर्माण होईल अशा ठिकाणी रिक्षा उभ्या करू नयेत. विशेषतः बसस्थानक परिसरात रिक्षा थांबविण्यास मनाई असल्याचे सांगत इतर वाहतूकविषयक सूचनाही देण्यात आल्या.
या बैठकीस सुमारे 150 ते 175 रिक्षा चालक व व्हॅन चालक उपस्थित होते. यावेळी चालकांच्या अडीअडचणीही पोलीस निरीक्षक जोगदंड यांनी जाणून घेतल्या. येत्या सोमवारपर्यंत सर्व कागदपत्रांची व इतर आवश्यक बाबींची पूर्तता करण्याचे निर्देश देण्यात आले असून, त्यानंतर पोलीस वाहतूक विभागामार्फत नियमित कारवाई करण्यात येणार असल्याचे जोगदंड यांनी सांगितले.



