टीम AM : स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयाकडे वर्षानुवर्षे अपेक्षित लक्ष दिले गेले नव्हते. मात्र, राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी ही परिस्थिती बदलण्याचा ठाम निर्धार केला होता. रुग्णालयाच्या सर्वांगीण विकासासाठी तब्बल 1000 कोटी रुपयांचा निधी टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून देत अंबाजोगाईतील आरोग्यसेवा अत्याधुनिक करण्याची ग्वाही त्यांनी अंबाजोगाईत आयोजित सभेत दिली होती. त्या दृष्टीने त्यांनी ठोस पावलेही उचलली होती. मंत्रालयातील त्यांच्या दालनात या संदर्भात वेळोवेळी आढावा बैठका घेण्यात आल्या होत्या.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी बारामती विमानतळावर लँडिंगदरम्यान झालेल्या भीषण विमान अपघातात अजित पवार यांचे अकाली निधन झाल्याने संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला. या दुर्दैवी घटनेमुळे बीड जिल्ह्यासह अंबाजोगाईच्या विकासाची चाकंही मंदावण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली ‘स्वाराती’ रुग्णालयाचा चेहरामोहरा बदलण्याचा संकल्प करण्यात आला होता. ‘स्वाराती’ रुग्णालयाला ‘सुपर स्पेशालिटी’ रुग्णालयाचा दर्जा मिळावा, असा त्यांचा मानस होता. मात्र, त्यांच्या अचानक जाण्यामुळे हे स्वप्न धुसर होऊ लागले आहे.
मात्र, आता उपमुख्यमंत्रिपदाची तसेच बीड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची धुरा अजित पवार यांच्या सुविद्य पत्नी सुनेत्रा पवार यांच्या खांद्यावर आली आहे. त्यामुळे अजित पवार यांनी पाहिलेले ‘स्वाराती’ रुग्णालयाच्या विकासाचे स्वप्न सुनेत्रा पवार पूर्ण करतील, अशी आशा अंबाजोगाईकर व्यक्त करीत आहेत. त्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनीही सक्रिय पाठपुरावा करणे गरजेचे असल्याची भावना व्यक्त होत आहे.
‘स्वाराती’ रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्थापनेला यंदा 50 वर्षे पूर्ण होत असून, त्या अनुषंगाने रुग्णालय परिसरात कोट्यवधी रुपयांची विकासकामे सुरू आहेत. ही कामे कोणत्याही कारणाने रखडू नयेत, यासाठी लोकप्रतिनिधींनी विशेष दक्षता घ्यावी, अशी अपेक्षा सर्वसामान्य जनतेतून व्यक्त केली जात आहे.



