टीम AM : बीड जिल्ह्यासह आसपासच्या जिल्ह्यातील गोरगरीब रुग्णांसाठी आधारवड ठरलेल्या अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय अर्थात ‘स्वाराती’ रुग्णालयाच्या कारभाराबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. एकेकाळी दर्जेदार उपचारांसाठी ओळख असलेल्या या रुग्णालयाची वाटचाल ‘सुपरस्पेशालिटी’ कडे होत आहे, हे सांगण्यात येत आहे. परंतू, रुग्णालयाची अवस्था तर प्राथमिक आरोग्य केंद्रासारखी झाल्याची संतप्त भावना रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांकडून व्यक्त होत आहे.
‘स्वाराती’ रुग्णालयात दररोज विविध आजारांचे हजारों रुग्ण दाखल होत आहेत. याचा आकडा दिवसेंदिवस वाढतचं चालला आहे. परंतू, ‘स्वाराती’ रुग्णालयात विविध आजारांवरील उपचारांसाठी आवश्यक असलेले तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध नसल्याने रुग्णांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. गंभीर आजारांच्या निदानासाठी आणि उपचारासाठी रुग्णांना इतर मोठ्या शहरांतील रुग्णालयांचा आधार घ्यावा लागत आहे. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांवर उपचाराचा अतिरिक्त खर्च आणि प्रवासाचा बोजा पडत आहे. विशेष म्हणजे, शासनाकडून कोट्यवधी रुपये खर्च करून उपलब्ध करून देण्यात आलेली अत्याधुनिक वैद्यकीय यंत्रसामग्रीही पुरेशा मनुष्यबळाअभावी किंवा तांत्रिक कारणांमुळे धूळखात पडून असल्याचे चित्र आहे. यंत्रसामग्री असूनही तिचा अपेक्षित उपयोग रुग्णांना होत नसेल, तर कोट्यवधींचा खर्च नेमका कुणाच्या उपयोगासाठी ? असा सवाल उपस्थित केला जात आहे. तेच डॉक्टर, मर्यादित सुविधा आणि वाढता रुग्णभार यामुळे रुग्णालयातील आरोग्यसेवेवर मोठा ताण निर्माण झाला आहे. गंभीर रुग्णांना वेळेत तज्ज्ञ उपचार मिळणे गरजेचे असताना सुविधांच्या अभावामुळे त्यांना रेफर करण्याची वेळ येत असल्याची तक्रार आहे.
लोकप्रतिनिधींच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
‘स्वाराती’ रुग्णालय हे केवळ अंबाजोगाईचे नव्हे तर बीडसह आसपासच्या अनेक जिल्ह्यांतील सर्वसामान्य नागरिकांसाठी महत्त्वाचे उपचार केंद्र आहे. त्यामुळे येथे तज्ज्ञ डॉक्टरांची पदे भरली जावीत, बंद किंवा नादुरुस्त यंत्रणा तातडीने कार्यान्वित करावी आणि अत्याधुनिक उपचार सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी होत आहे. मात्र, या प्रश्नाकडे स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाचे पुरेसे लक्ष नसल्याचा आरोप सातत्याने अंबाजोगाईकरांकडून केला जात आहे. रुग्णालयाच्या समस्या सातत्याने समोर येत असतानाही त्यावर ठोस आणि कायमस्वरूपी उपाययोजना होत नसतील, तर याला जबाबदार कोण ? असा सवालही आता उपस्थित होत आहे. गोरगरीब रुग्णांच्या जीवाशी संबंधित असलेल्या ‘स्वाराती’ च्या प्रश्नाकडे आता तरी गांभीर्याने पाहून तज्ज्ञ डॉक्टर, आवश्यक मनुष्यबळ, अत्याधुनिक यंत्रणा आणि दर्जेदार उपचार सुविधा तातडीने उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी रुग्ण व नागरिकांतून जोर धरत आहे.



