अंबाजोगाईचे कौशल्य विकास केंद्र रखडले : ग्रामीण विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना तडा, लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष…!

टीम AM : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत अंबाजोगाई येथे प्रस्तावित कौशल्य विकास केंद्रासाठी शहरातील सुमारे 25 एकर जागा विद्यापीठाकडे हस्तांतरित करण्यात आली होती. मात्र, या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाकडे पदवीधर मतदार संघाचे विद्यमान आमदार सतिश चव्हाण आणि स्थानिक लोकप्रतिनिधी आणि विद्यापीठ प्रशासनाकडून साफ दुर्लक्ष होत असल्याची चर्चा अंबाजोगाईत रंगली आहे.

अंबाजोगाई शहरात गेल्या चार वर्षांपासून सातत्याने या प्रकल्पाकडे लोकप्रतिनिधींनी पाठ फिरवल्याने हे केंद्र कागदावरच राहणार का ? असा सवाल विद्यार्थी आणि शिक्षणप्रेमींकडून उपस्थित केला जात आहे.

अंबाजोगाईसह बीड जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना कौशल्याधारित आणि व्यवसायाभिमुख शिक्षणाची संधी उपलब्ध व्हावी, या उद्देशाने हे केंद्र उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या माध्यमातून स्थानिक युवकांना रोजगारक्षम शिक्षण मिळून परिसराच्या शैक्षणिक व आर्थिक विकासाला चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती. मात्र, या केंद्राची फाईल विद्यापीठ प्रशासनाकडे धूळखात पडली आहे.

लोकप्रतिनिधींनी व विद्यापीठ प्रशासनाने या प्रकल्पाकडे गांभीर्याने लक्ष देऊन आवश्यक निधीची तरतूद करावी व कौशल्य विकास केंद्राच्या उभारणीस गती द्यावी, अशी मागणी आता जोर धरु लागली आहे. 

‘अंबाजोगाईकरांना आणखी किती दिवस आश्वासने देणार ?

छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्याने अंबाजोगाईच्या रखडलेल्या कौशल्य विकास केंद्राचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाकांक्षी असलेले हे केंद्र अद्याप प्रत्यक्षात न आल्याने ‘अंबाजोगाईकरांना आणखी किती दिवस आश्वासने देणार ?’ असा सवाल पदवीधरांकडून आमदार सतीश चव्हाण यांना केला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here