टीम AM : कोरड्या दुष्काळाची दाहकता पाहता अंबाजोगाई तालुक्यातील राडी तसेच परळी वैद्यनाथ तालुक्यातील वाघबेट परिसरात पावसाअभावी झालेल्या पिकांच्या नुकसानीची पाहणी आमदार धनंजय मुंडे यांनी केली. यावेळी स्थानिक शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेत आमदार मुंडेंनी त्यांना धीर दिला.
पावसाअभावी खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले असून, आगामी काळात पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही गंभीर होण्याची शक्यता आहे. शासनाने तातडीने नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले असून, नुकसानीचे अहवाल प्राप्त झाल्यानंतर शेतकऱ्यांना जास्तीत जास्त आर्थिक मदत मिळावी, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन चर्चा करणार असल्याचे मुंडे यांनी यावेळी सांगितले.
तसेच अल्पभूधारक व गरीब शेतकऱ्यांना तात्पुरता दिलासा मिळावा, यासाठी ‘पीएम’ किसान सन्मान निधी आणि राज्य शासनाच्या शेतकरी सन्मान निधीचे किमान दोन हप्ते एकत्रितपणे तातडीने वितरित करावेत, अशी मागणीही मुख्यमंत्र्यांकडे करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असून, त्यांना सर्वतोपरी मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा केला जाईल, असा विश्वास यावेळी आमदार धनंजय मुंडे यांच्याकडून व्यक्त करण्यात आला.
राडीतील कोळगीरे कुटुंबाला आमदार धनंजय मुंडेंचा मदतीचा हात
अंबाजोगाई तालुक्यातील राडी येथील अल्पभूधारक शेतकरी सतीश कोळगीरे यांनी दुष्काळाच्या संकटातून आत्महत्या केली होती. आज आमदार धनंजय मुंडे यांनी सहकाऱ्यांसमवेत कोळगीरे कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. कुटुंबाचा उदरनिर्वाह व मुलांच्या शिक्षणात अडथळा येऊ नये, यासाठी नाथ प्रतिष्ठानच्या वतीने एक लाख रुपयांची तात्पुरती आर्थिक मदत करण्यात आली. तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व अन्य संस्थांच्या माध्यमातून कुटुंबाला पुढील मदत मिळवून देण्याची व्यवस्था करण्यात आली.



