टीम AM : अंबाजोगाई येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह येथे विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचे जेवण दिले जात असल्याचा गंभीर आरोप माजी आमदार पृथ्वीराज साठे यांनी केला आहे. वसतिगृहाची प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर त्यांनी प्रशासनाच्या कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष अमर देशमुख, नगरसेवक राजपाल जावळे, सुधाकर जोगदंड, हमीद चौधरी यांच्यासह आदींची उपस्थिती होती. सोशल मिडीयावर विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाच्या पालेभाज्या दिल्या जात असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्या पार्श्वभूमीवर माजी आमदार पृथ्वीराज साठे आणि त्यांची टीम वसतीगृहात धडकली.
वसतीगृहाची पाहणी केल्यानंतर विद्यार्थ्यांना सकस आणि पौष्टिक आहार मिळणे अपेक्षित असताना त्यांना अत्यंत निकृष्ट दर्जाचे अन्न दिले जात असल्याचे साठे यांनी म्हटले आहे. यासोबतच संपूर्ण वसतिगृह परिसरात अस्वच्छता असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले. विशेषतः स्वयंपाकघर आणि स्वच्छतागृहांची अवस्था अत्यंत दयनीय असल्याचा आरोप त्यांनी केला. महापुरुषांच्या नावाने चालणाऱ्या शासकीय वसतिगृहात मागासवर्गीय आणि गोरगरीब विद्यार्थ्यांची अशी हेळसांड होत असेल, तर समाजकल्याण विभाग नेमके काय करत आहे ? असा सवाल पृथ्वीराज साठे यांनी उपस्थित केला. संबंधित अधिकारी व प्रशासनाचे याकडे लक्ष का नाही, याचीही त्यांनी विचारणा केली.
‘विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळणारा हा प्रकार आम्ही खपवून घेणार नाही,’ असा इशारा माजी आमदार पृथ्वीराज साठे यांनी दिला. वसतिगृहातील विद्यार्थ्यांना दर्जेदार अन्न, स्वच्छ वातावरण आणि आवश्यक सुविधा मिळण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली.



