टीम AM : मुलीच्या साखरपुड्याची लगबग सुरू असतानाच काळाने पित्याचा घात केला. केज तालुक्यातील माळेगाव येथे रस्त्याच्या कडेला मुरूम टाकताना हायवा टिप्परच्या बॉडीचा वरून गेलेल्या वीज तारेला स्पर्श झाला. त्यामुळे टिप्परमध्ये वीज प्रवाह उतरून चालकाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. उस्मान गबरू शेख (वय 45, रा. दैठणा, ता. अंबाजोगाई) असे मृत चालकाचे नाव आहे.
उस्मान शेख हे गेल्या दहा महिन्यांपासून अंबाजोगाई येथील ‘यश कन्स्ट्रक्शन’ कंपनीच्या हायवा टिप्परवर चालक म्हणून काम करत होते. गुरुवारी सकाळी ते टिप्परमध्ये मुरूम भरून माळेगाव येथे रस्त्याच्या कडेला टाकण्यासाठी गेले होते. सकाळी साडेअकराच्या सुमारास मुरूम खाली करण्यासाठी टिप्परची बॉडी वर करत असताना तिचा वरून गेलेल्या वीज तारेला स्पर्श झाला.
वीज तारेला स्पर्श होताच टिप्परमध्ये अचानक वीज प्रवाह उतरला. या दुर्घटनेत उस्मान शेख यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर त्यांचा मृतदेह अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी हलविण्यात आला.
रविवारी साखरपुडा, दिवाळीत लग्न; नियतीचा क्रूर घाला…!
उस्मान शेख यांच्या मुलीचे लग्न केज तालुक्यातील युसुफवडगाव येथील युवकासोबत ठरले होते. येत्या रविवारी, दि. 16 ऑगस्ट रोजी मुलीचा साखरपुडा होणार होता, तर दिवाळीत लग्न सोहळा पार पडणार होता. घरात लग्नाची तयारी आणि आनंदाचे वातावरण असतानाच पित्याचा अपघाती मृत्यू झाल्याने शेख कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
उस्मान शेख हे अल्पभूधारक असून त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे आणि एक मुलगी असा परिवार आहे. त्यांचा एक मुलगा नववीत, तर दुसरा बारावीत शिक्षण घेत आहे. घरातील कर्त्या पुरुषाचा अचानक मृत्यू झाल्याने कुटुंबावर मोठा आर्थिक आणि मानसिक आघात झाला आहे. उस्मान शेख यांच्या दोन भावांपैकी एक रिक्षा चालवतो, तर दुसरा ‘जेसीबी’ चालक आहे. या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच दैठणा तसेच माळेगाव परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून शेख कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे.



