अंबाजोगाईत ‘स्वातंत्र्य दिन’ मोठ्या उत्साहात साजरा

टीम AM : अंबाजोगाई तालुक्यात ठिकठिकाणी  देशाचा 80 वा ‘स्वातंत्र्य दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. स्वातंत्र्य दिनानिमित्त शहरातील पोलीस परेड ग्राऊंडवर मुख्य शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. 

अंबाजोगाईच्या अपर जिल्हाधिकारी अश्विनी सोनवणे – जिरंगे  यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी पोलिसांनी ध्वजाला मानवंदना दिली. याप्रसंगी आमदार नमिता मुंदडा अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके, उपजिल्हाधिकारी दिपक वजाळे, तहसीलदार विलास तरंगे उपस्थित होते.

ध्वजारोहणानंतर उपस्थितांना अपर जिल्हाधिकारी अश्विनी जिरंगे आणि अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके यांनी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. या मुख्य शासकीय ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाला वरिष्ठ पोलिस अधिकारी, विविध शासकीय अधिकारी, विविध राजकीय पक्षांचे नेते, लोकप्रतिनिधी,   स्वातंत्र्य सैनिक, माजी सैनिक, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, वकील यासह सर्वच क्षेत्रातील मान्यवरांची, नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. 

अंबाजोगाई शहरातील जिल्हा परिषद मैदानात नगरपरिषदेचे नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. नगरपरिषदेतही उपनगराध्यक्ष दिनेश भराडिया यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी नगरपरिषदेचे सर्व कर्मचारी उपस्थित होते. अंबाजोगाई पंचायत समितीच्या प्रांगणातही गटविकास अधिकारी बळवंत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी पंचायत समितीचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शहरातील सर्व शासकीय – निमशासकीय कार्यालयात ‘स्वातंत्र्य दिन’ उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला

अंबाजोगाई शहरातील सर्व शैक्षणिक संस्था, सामाजिक संस्था याही ठिकाणी स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना  स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व पटवून देण्यासाठी व्याख्याने आयोजित करण्यात आली होती. तसेच देशभक्तीपर गायन, नृत्याचे सादरीकरणही शैक्षणिक संस्थांमध्ये करण्यात आले. देशाचा ‘स्वातंत्र्य दिन’ मोठ्या उत्साहात अंबाजोगाई पंचक्रोशीत साजरा करण्यात आला. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here