टीम AM : अनुसूचित जातीच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या विरोधात अंबाजोगाईत काढण्यात आलेल्या विराट मोर्चात रिपब्लिकन सेनेचे प्रमुख आनंदराज आंबेडकर यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. आरक्षण उपवर्गीकरणाच्या माध्यमातून आंबेडकरवाद्यांचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप करत, हा प्रयत्न कोणत्याही परिस्थितीत यशस्वी होऊ देणार नाही, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
यावेळी आनंदराज आंबेडकर यांनी सरकारला थेट इशारा देताना, “भीमा कोरेगावचा इतिहास विसरू नका. आंबेडकरवाद्यांच्या नादी लागू नका. जंतरमंतरवर एक लढाई झाली, प्रधान गेला, आम्ही रस्त्यावर उतरलो तर देवेंद्र – नरेंद्रही जातील,” असे आक्रमक वक्तव्य केले.
6 डिसेंबरपर्यंत अनुसूचित जातीच्या आरक्षणातील उपवर्गीकरण मागे घेतले नाही, तर कोण किती पाण्यात आहे हे दाखवून देऊ, असा इशाराही त्यांनी दिला. रस्त्यावरची ताकद पाहून सरकार घाबरले असून, हा लढा आता थांबणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आरक्षणाच्या हक्कासाठी पुढील काळात आणखी तीव्र आंदोलन उभारण्यात येणार असून, पुढील लढाईसाठी सर्वांनी सज्ज राहावे, असे आवाहनही आनंदराज आंबेडकर यांनी केले.
या विराट मोर्चाला मोठ्या संख्येने महिला, ज्येष्ठ नागरिक आणि भीमसैनिक उपस्थित होते. यावेळी ॲड. सुरेश माने, रुक्मिणी लोंढे, नरसिंगे, रोहिदास बन्सोडे यांच्यासह अनेक मान्यवरांनी मनोगत व्यक्त करत उपवर्गीकरणाला विरोध दर्शविला. ‘जयभीम’ च्या घोषणांनी यावेळी अंबाजोगाई शहर दणाणून गेले.



