हजारोंच्या सहभागाने विराट मोर्चा, आनंदराज आंबेडकर, अमन आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती
टीम AM : आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या विरोधात अंबाजोगाईत आक्रोशाचा एल्गार पाहायला मिळाला. आरक्षणाच्या हक्काला धक्का देण्याचा प्रयत्न सहन केला जाणार नाही, असा संतप्त संदेश देत हजारो भीमसैनिक, महिला, ज्येष्ठ नागरिक आज दिनांक 11 ऑगस्ट मंगळवार रोजी रस्त्यावर उतरले. निळे झेंडे, पांढरी वस्त्रे आणि ‘जयभीम’ च्या बुलंद घोषणांनी अवघे अंबाजोगाई शहर अक्षरशः दणाणून गेले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करून या विराट मोर्चाला सुरुवात झाली. मोर्चाच्या अग्रभागी रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर, युवा नेते अमन आंबेडकर यांच्यासह विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. आरक्षणाच्या उपवर्गीकरणाविरोधातील संताप आणि आपल्या हक्कासाठीची लढाऊ भूमिका मोर्चातून प्रकर्षाने दिसून आली.
मोर्चात सहभागी झालेल्या महिला, ज्येष्ठ नागरिक आणि युवकांनी हातात निळे झेंडे घेत जोरदार घोषणाबाजी केली. ‘जयभीम’ च्या घोषणांसोबतच ढोल – ताशांचा कडकडाट सुरू असल्याने वातावरण अक्षरशः भारावून गेले होते. रस्त्यांवर दिसणारी निळ्या झेंड्यांची गर्दी आणि हजारोंच्या संख्येने एकत्र आलेला जनसमुदाय पाहता अंबाजोगाईत जणू निळं वादळच उसळल्याचे चित्र निर्माण झाले होते.
आरक्षण हा केवळ सवलतीचा विषय नसून सामाजिक न्याय आणि प्रतिनिधित्वाचा प्रश्न असल्याची भावना आंदोलकांमध्ये दिसून आली. आपल्या हक्कांवर गदा आणणारे कोणतेही निर्णय मान्य केले जाणार नाहीत, असा आक्रमक सूर यावेळी उमटला. या विराट मोर्चामुळे अंबाजोगाईच्या रस्त्यांवर भीमशक्तीचा बुलंद आवाज घुमत राहिला. निळ्या झेंड्यांच्या महासागराने शहर व्यापले आणि आरक्षणाच्या हक्कासाठीची एकजूट पुन्हा एकदा ताकदीने दाखवून दिली.
उपवर्गीकरणाविरोधात आनंदराज आंबेडकरांचा सरकारला इशारा
अनुसूचित जातीच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाविरोधात अंबाजोगाईत झालेल्या मोर्चात रिपब्लिकन सेनेचे प्रमुख आनंदराज आंबेडकर यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. “भीमा कोरेगावचा इतिहास विसरू नका. आंबेडकरवाद्यांच्या नादी लागू नका. जंतरमंतरवर एक लढाई झाली, प्रधान गेला, आम्ही रस्त्यावर उतरलो तर देवेंद्र – नरेंद्रही जातील,” असा इशारा त्यांनी दिला.
आरक्षण उपवर्गीकरणाच्या माध्यमातून आंबेडकरवाद्यांचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न हाणून पाडू, असे सांगत 6 डिसेंबरपर्यंत उपवर्गीकरण मागे घेतले नाही, तर कोण किती पाण्यात आहे हे दाखवून देऊ, असा इशारा त्यांनी दिला. रस्त्यावरची ताकद पाहून सरकार घाबरले असून, आंदोलन सुरूच राहणार आहे. पुढील लढाईसाठी सर्वांनी सज्ज राहावे, असे आवाहन आनंदराज आंबेडकर यांनी केले. यावेळी ॲड. सुरेश माने, रुक्मिणी लोंढे, नरसिंगे, रोहिदास बन्सोडे यांच्यासह अनेकांनी मनोगत व्यक्त केले.
मुख्यमंत्र्यांना निवेदन : आरक्षण उपवर्गीकरणाची प्रक्रिया थांबवावी…!
अनुसूचित जातीच्या आरक्षण उपवर्गीकरणास विरोध करत विविध मागण्यांचे निवेदन उपजिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आले. न्यायमूर्ती अनंत मनोहर बद्दर यांचा अहवाल तात्काळ रद्द करून उपवर्गीकरणाची प्रक्रिया थांबवावी, अशी प्रमुख मागणी करण्यात आली. यासोबतच अनुसूचित जातीतील 2 लाख 50 हजार सरकारी नोकऱ्यांचा अनुशेष तातडीने भरावा, आरक्षणाची टक्केवारी लोकसंख्येच्या प्रमाणात 13 टक्क्यांवरून 20 टक्के करावी आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत भरीव वाढ करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. या निवेदनावर भीमराव सरवदे, ॲड. माणिक आदमाने, बब्रुवान पोटभरे, सुधाकर हातागळे, अरुण बनसोडे, महेंद्र निकाळजे, श्रीधर सिरसट, संजय वाघमारे, दशरथ सोनवणे यांच्यासह आदींच्या सह्या आहेत.



