अंबाजोगाई येथील न्यायालय परिसरातील मारहाण प्रकरणात वकिलाचे स्पष्टीकरण
टीम AM : अंबाजोगाई येथील न्यायालय परिसरात एका वकिलाने एका व्यक्तीला केलेल्या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या प्रकरणात व्हिडिओमध्ये दिसणारे वकील ॲड. अमोल देशमुख यांनी पत्रकार परिषद घेत अर्धवट व्हिडिओ चित्रीकरण करणाऱ्या व्यक्तीवर आणि अर्धवट व्हिडिओ दाखवून बातम्या चालवणाऱ्या प्रसिद्धी माध्यमावर नाराजी व्यक्त केली. 5 ऑगस्ट रोजी आम्ही न्यायालयीन कामकाजासाठी कुटुंबासोबत अंबाजोगाई न्यायालयात आलो असता माझे चुलत भाऊ कल्याण ज्ञानोबा देशमुख याने माझ्यावर हल्ला केला. तसेच माझ्या वडिलावर देखील हल्ला केला होता. त्यांना सोडवण्यासाठी मी प्रतिकार केला असता या घटनेचा अर्धवट व्हिडिओ चित्रीकरण करून तो व्हायरल केला असल्याचा आरोप त्यांनी आज पत्रकार परिषदेत केला. शिवाय न्यायालय परिसरात कोणतीही परवानगी न घेता हा व्हिडिओ चित्रीकरण करून व्हायरल करणाऱ्या व्यक्ती विरोधात एक कोटी रुपयांचा अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे देखील ते म्हणाले.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, दिनांक 5 ऑगस्ट रोजी अंबाजोगाई न्यायालय परिसरात मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. सदरील व्हिडिओ हा संपूर्ण घटनेचा नसून हेतूपुरस्सर आमच्या कुटुंबाची आणि माझी तसेच वकिली व्यवसायाची बदनामी करण्यासाठी अर्धवट चित्रीकरण करुन व्हायरल केल्याचा आरोप ॲड. अमोल देशमुख यांनी केला. ॲड. अमोल देशमुख यांचे वडील तुकाराम देशमुख आणि मारहाण करणारा व्यक्ती कल्याण देशमुख यांचे वडील ज्ञानोबा देशमुख यांच्याविरुद्ध दिवाणी न्यायालयात दावा सुरू आहे. या प्रकरणाची सुनावा असल्याने पाच ऑगस्ट रोजी ॲड. अमोल देशमुख हे आपल्या आई-वडिलांसह न्यायालय परिसरात दाखल झाले होते. यावेळी कल्याण देशमुख यांनी सुरुवातीला ॲड अमोल देशमुख यांच्यावर हल्ला करून त्यांना शिवीगाळ व मारहाण केली. तसेच त्यांनी ॲड. अमोल देशमुख यांचे वडील तुकाराम देशमुख यांच्यावर देखील हल्ला केला आणि त्यांना मारहाण केली. यावेळी अमोल देशमुख यांनी प्रतिकार करून त्यांच्या वडिलांना सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, कल्याण देशमुख याने वडिलांची कॉलर पकडली असल्याने तिथे कर्तव्यावर असलेल्या पोलिसांनी मध्यस्थी करत हा वाद सोडवला. या वादाचे अर्धवट चित्रीकरण करून सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल करून ॲड. अमोल देशमुख त्यांचे वडील तुकाराम देशमुख आणि कुटुंबाची बदनामी केल्याचा आरोप ॲड. अमोल देशमुख यांनी केला आहे. त्यांनी या प्रकरणात तात्काळ अंबाजोगाई तालुका न्यायालयाचे अधीक्षक यांच्याकडे तक्रार केली आहे. तसेच अंबाजोगाई शहर पोलीस ठाणे येथे देखील या हल्ल्याबाबत ऑनलाईन तक्रार नोंदवली आहे.
अशाप्रकारे अर्धवट व्हिडिओ चित्रीकरण करून तो व्हिडिओ समाज माध्यमावर आणि प्रसिद्धी माध्यमातून व्हायरल करून कुटुंबाची बदनामी केल्याने सध्या देशमुख कुटुंब तणावात आहे. या प्रकरणात कल्याण ज्ञानोबा देशमुख यांच्याविरुद्ध एक कोटी रुपयांचा मानहानीचा दावा दाखल करणार असल्याची माहिती ॲड. अमोल देशमुख यांनी दिली.
आमच्यावर खोटे गुन्हे दाखल केले
कल्याण ज्ञानोबा देशमुख आणि ज्ञानोबा बाजीराव देशमुख यांच्या सांगण्यावरून एका महिलेने ॲड. अमोल देशमुख त्यांचे भाऊ अतुल देशमुख आणि त्यांच्या आई विजया देशमुख यांच्या विरोधात खोटा विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता. त्या गुन्हयात पोलिसांनी तपास करून कोणतेही पुरावे न आढळल्याने या गुन्हयातून या तिघांची नावे देखील वगळली आहेत. दिवाणी न्यायालयात सुरू असलेल्या दाव्याच्या तारखांना मज्जाव करण्यासाठी अशा प्रकारे ज्ञानोबा देशमुख यांच्याकडून वारंवार कधी हल्ला करून तर कधी खोट्या तक्रारी करून ॲड. अमोल देशमुख आणि त्यांच्या कुटुंबाला नाहक त्रास दिला जात असल्याचा आरोप देखील या पत्रकार परिषदेत करण्यात आला.



