टीम AM : रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील खांडपे – कोंदिवडे रस्त्याची दुरवस्था अखेर प्रशासनाच्या निदर्शनास आली. मोठमोठे खड्डे आणि पावसामुळे साचणाऱ्या पाण्यामुळे ग्रामस्थांच्या होत असलेल्या त्रासावर खांडपे जिल्हा परिषद शाळेतील मुलींनी अनोख्या पद्धतीने आवाज उठवला.
हातात माईक नसल्याने छत्रीलाच माईक बनवत या मुलींनी मोबाईलच्या कॅमेऱ्यासमोर वृत्तवाहिनीच्या बातमीची नक्कल करत रस्त्याचा ‘ग्राउंड रिपोर्ट’ तयार केला. नेहा घारे हिने रिपोर्टरची भूमिका साकारली, तर मानसी पवार हिने कॅमेरा हाताळला. रस्त्यावरील खड्डे, त्यात साचलेले पाणी आणि या मार्गावरून प्रवास करताना शाळकरी मुलांसह ग्रामस्थांना होणाऱ्या त्रासाची माहिती त्यांनी आपल्या खास शैलीत मांडली. एक मोबाईल, एक छत्री आणि समस्येविरोधात आवाज एवढ्याच साधनांवर तयार केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला.
व्हिडीओ व्हायरल होताच रस्त्याच्या दुरवस्थेचा प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचला. त्यानंतर खांडपे – कोंदिवडे रस्त्यावरील खड्डे बुजवून दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. स्थानिक आमदारांनी संबंधित विभागाशी संपर्क साधून तातडीने रस्ता दुरुस्तीच्या सूचना दिल्याचे सांगण्यात आले. मुलींनी पत्रकाराची भूमिका साकारत मांडलेला प्रश्न अखेर प्रत्यक्ष कृतीपर्यंत पोहोचला आहे. त्यांच्या या कल्पकतेचे आणि सामाजिक जाणीवेचे कौतुक होत असून, ‘आवाज उठवला तर बदल घडतो’ याचे हे सुंदर उदाहरण ठरले आहे.



