टीम AM : दुष्काळजन्य परिस्थितीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाल्याने नैराश्यातून राडी येथील एका तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी सकाळी समोर आली. सतीश शिवाजी कोळगीर असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. राडी – शिवरातील गट क्रमांक 116 मध्ये त्यांची अल्पभूधारक शेतजमीन आहे. यंदा पावसाने ओढ दिल्याने त्यांच्या शेतातील सोयाबीन पिकाची अवस्था अत्यंत खराब झाली होती. गुरुवारी दिवसभर त्यांनी शेतातील वाळलेले सोयाबीन उपटून काढले. पिकाची दयनीय अवस्था पाहून ते अस्वस्थ झाले होते.
शुक्रवारी सकाळी त्यांनी शेतातील झाडाला गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात पाठवला.
सतीश कोळगीर यांच्या पश्चात वृद्ध आई, पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. अल्पभूधारक शेतकऱ्याच्या या दुर्दैवी मृत्यूने राडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दुष्काळसदृश परिस्थितीत पिकांचे झालेले नुकसान आणि शेतकऱ्यांवरील वाढता आर्थिक ताण पुन्हा एकदा या घटनेच्या निमित्ताने समोर आला आहे.



