विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आ. संगिता ठोंबरे यांच्या अडचणीत वाढ
केज : लोकनेते गोपीनाथ मुंडे मागासवर्गीय सुतगिरणी प्रकरणात कथीत संचालक गणपती सोनप्पा कांबळे यांच्या बनावट स्वाक्षऱ्या करून संचालक पदावर नियुक्ती केल्याप्रकरणी केज न्यायालयाने सुतगिरणीचे चेअरमन डॉ. विजयप्रकाश ठोंबरे, आमदार संगिता ठोंबरे यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्याचे आदेश बुधवारी दिले. दरम्यान न्यायालयाच्या या आदेशाने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आ. संगिता ठोंबरे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
केज तालुक्यातील लाडेगाव येथील गणपती सोनप्पा कांबळे यांनी तक्रारीत म्हणटले आहे की, सदर गैरव्यवहारात आपल्या खोटया सहया चेअरमन व आमदार संगिता ठोंबरे यांनी करून शासनाची फसवणूक करून आपणास नाहक गोवण्यात आले. सदर आर्थीक व्यवहारात आपला काही एक संबध नसून पुराव्या दाखल त्यांनी खोटया सहया केल्याचा श्रीमती अश्विनी पवार फॉरेन्सिक तज्ञाचा अहवाल व शपथ पत्र जोडून सुतगिरणीचे चेअरमन व आमदार यांच्यावर गुन्हा दाखल करून चौकशी करण्यात यावी अशी तक्रार दाखल केली होती. त्यानुसार न्यायालयाच्या आदेशानुसार आमदार संगिता ठोंबरे व चेअरमन विजयप्रकाश ठोंबरे यांच्यावर बनावट दस्तावेज तयार करून ते माहिती असतानाही खरे दाखवून फसवणूक केली असल्याचा गुन्हे दाखल करून चौकशी करून न्यायालयात चार्जशीट दाखल करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती ॲड. संतोष मुंडे यांनी दिली.
माझा न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास – आ. संगिता ठोंबरे
मला विरोध करण्यासाठी राजकीय विरोधकांशी हातमिळवणी करून व निवडणूक डोळयासमोर ठेवून मला बदनाम करण्याचे हे षडयंत्र आहे. यापुर्वीही सुतगिरणी विरोधात अनेक तक्रारी उच्च न्यायालय व वस्त्रोदयोग आयुक्त, नागपुर यांच्याकडे काही लोकांनी केल्या होत्या. तसेच दाखल केलेल्या तक्रारी संदर्भात वस्त्रोदयोग आयुक्त यांनी त्यांच्या या अहवालात या सुतगिरणीत कसल्याही प्रकारचे आर्थीक व इतर गैरव्यवहार झाले नसल्याचे नमुद केलेले आहे. माझा न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. असे आ. ठोंबरे यांनी प्रसिध्दीपत्रकात म्हणटले आहे.