टीम AM : बीड जिल्ह्यातील नेकनूरजवळ टिपर आणि पिकअप यांच्यात भीषण अपघात झाला आहे. या दुर्घटनेत अंबाजोगाई शहरातील बाराभाई गल्ली येथील शौकत भाई कुरैशी यांच्या दोन मुलांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे अंबाजोगाई शहरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नेकनूर येथे दुपारच्या सुमारास टिपर आणि पिकअप यांच्यात जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात हनीफ शौकत कुरेशी (वय – 22) आणि आरेफ शौकत कुरेशी (वय – 20) या दोन सख्या भावांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. या अपघाताची भीषणता इतकी होती की, वाहनातील दोन गायी आणि तीन बैलांचाही मृत्यू झाला. त्यामुळे या दुर्घटनेत मोठी जीवितहानी झाली आहे.
दरम्यान, अंबाजोगाईतील शौकत भाई कुरैशी यांच्या दोन मुलांचा अपघाती मृत्यू झाल्याची बातमी समजताच परिसरात शोककळा पसरली आहे. अपघात नेमका कशामुळे झाला ?, याबाबतची सविस्तर माहिती अद्याप समोर आलेली नाही.



