दुष्काळ आणि नापिकीला कंटाळून राडीतील शेतकऱ्याची आत्महत्या…! 

टीम AM : अंबाजोगाई तालुक्यातील राडी येथे दुष्काळी परिस्थिती आणि सततच्या नापिकीमुळे आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या 64 वर्षीय शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना 15 ऑक्टोबर रोजी घडली. अंकुश रंगनाथ गंगणे (रा. राडी, ता. अंबाजोगाई) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. या घटनेमुळे राडी गावासह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

एक हेक्टर माळरानावरील शेती; पिके जळाल्याने आर्थिक संकट

मिळालेल्या माहितीनुसार, अंकुश गंगणे यांच्या नावावर सुमारे एक हेक्टर शेती होती. त्यांची शेती माळरानावर असल्याने यंदा अत्यल्प पावसाचा मोठा फटका पिकांना बसला. पावसाअभावी पिके जळून गेल्याने हातात काहीच उत्पन्न आले नाही. सततच्या नापिकीमुळे ते चिंतेत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. शेतीतून उत्पन्न मिळत नसल्याने त्यांच्यासमोर आर्थिक अडचणी उभ्या राहिल्या होत्या.

याच परिस्थितीत त्यांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपवले. या घटनेने दुष्काळ आणि नापिकीच्या संकटात सापडलेल्या शेतकरी कुटुंबांच्या प्रश्नांकडे पुन्हा एकदा लक्ष वेधले आहे.

पत्नी आणि दोन मुलांवर दुःखाचा डोंगर

अंकुश गंगणे यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे. कुटुंबातील कर्त्या व्यक्तीच्या निधनाने या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

घटनेची माहिती मिळताच कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी पोलीस पाटील व तलाठी यांना कळवले. याप्रकरणी अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here