मुख्याधिकारी प्रियांका टोंंगे यांच्याशी फोनवर केली चर्चा
टीम AM : अंबाजोगाई शहरातील बँक ऑफ महाराष्ट्र लगत असलेली निजाम कालीन विहीर बुजवून त्या ठिकाणी देण्यात आलेल्या अनाधिकृत दुकानांचे अतिक्रमण काढुन पुर्वीच्या निजामकालीन विहीरीचे पुनर्जिवीत करण्यासाठी लोकजनशक्ती पार्टीच्या वतीने अशोक काळे यांनी येथील उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या चार दिवसांपासून आमरण उपोषण सुरु केले आहे. या उपोषणाला विविध राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी, संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पाठिंबा दर्शविला आहे. दरम्यान, नगरपरिषद प्रशासन ‘त्या’ विहिरीसंदर्भात काय भूमिका घेते याकडे अंबाजोगाईकरांचे लक्ष लागले असतानाच बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग सोनवणे यांनी आज दिनांक 3 ऑगस्ट रविवार रोजी उपोषणकर्त्या अशोक काळे यांची भेट घेऊन विचारपूस केली.

दरम्यान, ‘त्या’ विहिरीसंंदर्भात खा. सोनवणे यांनी मुख्याधिकारी डॉ. प्रियांका टोंगे यांच्याशी फोनवर संवाद साधला. यावेळी मुख्याधिकारी टोंगे यांनी ‘त्या’ विहिरीसंदर्भात तातडीने योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिल्याची माहिती उपोषणकर्त्यांनी आमच्या प्रतिनिधींना दिली आहे. यावेळी खा. बजरंग सोनवणे यांनी नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांंशीही संवाद साधत या संदर्भात लवकर निर्णय घेण्याचे सूचित केले, असेही सांगण्यात आले आहे.
यावेळी माजी आमदार पृथ्वीराज साठे, तालुकाध्यक्ष अमर देशमुख, ‘भीमशक्ती’ चे भिमराव सरवदे, लोकजनशक्ती पार्टीचे राजेश वाहुळे, ॲड. इस्माईल गवळी, शिवसेनेचे मदन परदेशी, हमीद चौधरी, यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.