अंबाजोगाईत बेरोजगारीचं भीषण वास्तव : पोलीस पाटील पदासाठी उच्चशिक्षितांची झुंबड…!

पोलीस पाटलाच्या 202 जागांसाठी 952 उमेदवार मुलाखतीसाठी पात्र…! 

टीम AM : अंबाजोगाई तालुक्यातील पोलीस पाटील पदांच्या भरती प्रक्रियेतून ग्रामीण भागातील बेरोजगारीचे तीव्र आणि चिंताजनक चित्र समोर आले आहे. एकूण 202 रिक्त जागांसाठी तब्बल 1987 उमेदवारांनी लेखी परीक्षा दिली होती, तर त्यापैकी 952 उमेदवार मुलाखतीसाठी पात्र ठरले आहेत. विशेष बाब म्हणजे, या पदासाठी शिक्षणाची अट केवळ 10 वी पास असताना देखील एम.टेक., बी.टेक., विविध शाखांतील इंजिनियरिंग पदवीधर, ‘एमबीए’ बी.फार्म, डी.फार्म, तसेच बी.एड. आणि डी.एड. सारखी व्यावसायिक व पदव्युत्तर शिक्षण घेतलेले उमेदवार मोठ्या संख्येने मुलाखतीसाठी उपस्थित झाले आहेत. उच्च शिक्षण घेऊनही स्थिर नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना गावपातळीवरील या पदाकडे वळावे लागत असल्याचे वास्तव यातून अधोरेखित होते.

पोलीस पाटील हे पद गावपातळीवरील प्रशासनातील एक महत्त्वाची कडी मानले जाते. गावात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाला सहकार्य करणे, गावात घडणाऱ्या गुन्हेगारी घटनांची माहिती संबंधित पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचवणे, तसेच पोलीस व ग्रामस्थ यांच्यात समन्वय साधणे ही पोलीस पाटलाची प्रमुख जबाबदारी असते. ग्रामीण समाजव्यवस्थेत या पदाला सामाजिक मान्यता आणि स्थान असल्यानेही उमेदवारांचा कल वाढत असल्याचे बोलले जाते. मात्र, अल्प मानधन, मर्यादित अधिकार आणि अनिश्चित भवितव्य असूनही इतक्या मोठ्या प्रमाणावर उच्चशिक्षित तरुणांनी अर्ज केल्याने अंबाजोगाई तालुक्यातील रोजगार संधींच्या अभावाचे चित्र स्पष्ट होते. 

शिक्षणाचा स्तर वाढत असताना त्यानुसार रोजगारनिर्मिती होत नसल्याची खंत अनेक उमेदवारांनी यावेळी व्यक्त केली आहे. या भरती प्रक्रियेकडे आता संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले असून, अंतिम निवडीत कोणाला संधी मिळणार याबाबत उत्सुकता वाढली आहे. दरम्यान, या आकडेवारीने ग्रामीण भागातील बेरोजगारीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आणला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here