टीम AM : देशभरात गाजत असलेल्या ‘नीट’ परीक्षांच्या पेपर लीक प्रकरणांच्या निषेधार्थ दिल्लीतील ‘जंतरमंतर’ येथे सुरू असलेल्या आंदोलनात अंबाजोगाईतील तरुण मोहम्मद तौसिफ रजा याने सहभाग नोंदवला. आंदोलनादरम्यान त्याने विद्यार्थ्यांच्या समस्या आणि संताप थेट माध्यमांसमोर मांडत केंद्र सरकारला शायरीच्या माध्यमातून रोखठोक प्रश्न विचारले. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
‘द लल्लनटॉप’ या डिजिटल न्यूज चॅनेलशी संवाद साधताना तौसिफ म्हणाला की, आर्थिक अडचणींचा सामना करत अनेक पालक आपल्या मुलांना शिक्षण देतात. मात्र, पेपर लीकसारख्या गंभीर प्रकारांमुळे मेहनती आणि गुणवंत विद्यार्थ्यांच्या भविष्यावर पाणी फिरत आहे. या पार्श्वभूमीवर त्याने शिक्षण व्यवस्थेतील पारदर्शकतेबाबत प्रश्न उपस्थित करत जबाबदारी निश्चित करण्याची मागणी केली. संवादादरम्यान त्याने शायरीच्या माध्यमातून सरकारवर टीका करत विद्यार्थ्यांच्या वेदना व्यक्त केल्या.
पेपर लीकच्या घटनांमुळे अनेक तरुणांचे करिअर धोक्यात आले असून, काहींना नैराश्यालाही सामोरे जावे लागल्याचे सांगत या परिस्थितीस जबाबदार कोण ? असा सवालही त्याने उपस्थित केला.
अंबाजोगाईसारख्या छोट्या शहरातील एका तरुणाने देशाच्या राजधानीत विद्यार्थ्यांचा आवाज बुलंद केल्याने त्याच्या भूमिकेची सोशल मीडियावर चर्चा सुरू असून, अनेकांकडून त्याच्या धाडसाचे कौतुक केले जात आहे.



