आमदार रोहित पवार शेतकऱ्यांच्या बांधावर ; मग अंबाजोगाईतील सत्ताधारी लोकप्रतिनिधी आहेत कुठे ? शेतकऱ्यांचा संतप्त सवाल…!

टीम AM : पावसाअभावी खरीप पिकांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांनी रविवारी (दि. 20 सप्टेंबर) अंबाजोगाई तालुक्यातील दगडवाडी येथे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष पिकांची पाहणी केली. शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या व्यथा जाणून घेत हेक्टरी 50 हजार रुपये मदत देण्याची मागणी केली.

रोहित पवार यांनी सोयाबीनसह खरीप पिकांचे मोठे नुकसान झाल्याचे सांगत सरकारने तातडीने दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, शेतमजूर कुटुंबांना मदत करावी तसेच चारा छावण्या सुरू कराव्यात, अशी मागणी केली. दरम्यान, राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे हे देखील विविध दुष्काळग्रस्त भागांत शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी करत आहेत. शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांना दिलासा देत शासनाकडून मदतीचे आश्वासनही दिले जात आहे.

आश्वासनांपेक्षा प्रत्यक्ष मदतीची गरज 

एकीकडे विरोधी पक्षाचे आमदार आणि राज्याचे कृषिमंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचत असताना, अंबाजोगाईतील सत्ताधारी लोकप्रतिनिधी मात्र कुठे आहेत ? असा प्रश्न सध्या तालुक्यात चर्चिला जात आहे. पिकांचे नुकसान डोळ्यांसमोर असताना शेतकऱ्यांना केवळ आश्वासनांपेक्षा प्रत्यक्ष मदतीची गरज आहे. त्यामुळे सत्ताधारी लोकप्रतिनिधी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन परिस्थितीची पाहणी करून शासनाकडे ठोस मदतीसाठी पाठपुरावा करणार का ? याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here