टीम AM : अंबाजोगाई शहरातील बँक कॉलनी परिसरात एका व्यापाऱ्याचे बंद घर फोडून अज्ञात चोरट्यांनी सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम असा एकूण 24 लाख 80 हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
बँक कॉलनी परिसरातील रहिवासी व कापड व्यावसायिक गुलाबचंद हनुमानदास सारडा (वय – 56) यांचे घर दि. 17 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता ते 19 सप्टेंबर रोजी सकाळी 9 वाजेपर्यंत बंद होते. याच कालावधीत अज्ञात चोरट्यांनी घराच्या लोखंडी गेटचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर पाठीमागील दरवाजाचे कुलूप व बेडरूममधील कपाटाचे लॉक तोडून कपाटात ठेवलेले सोन्या – चांदीचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली.
या चोरीत सोन्या – चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम असा एकूण 24 लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी दि. 20 सप्टेंबर रोजी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक आनंद शिंदे करीत आहेत.



