टीम AM : इयत्ता सातवीत शिकणाऱ्या अब्दुल्ला इमरान मंगलगिरी या 12 वर्षीय विद्यार्थ्याने अवघ्या ₹ 9 हजारांच्या खर्चात सामान्य सायकलचे सौरऊर्जेवर चालणाऱ्या सायकलमध्ये रूपांतर केले आहे. तब्बल दोन वर्षे प्रयोग आणि संशोधन केल्यानंतर त्याने ही कल्पना प्रत्यक्षात साकारली.
सोलापूर येथे वास्तव्यास असलेल्या अब्दुल्ला याला लहानपणापासूनच विविध वस्तू उघडून त्या कशा काम करतात, हे जाणून घेण्याची उत्सुकता होती. याच कुतूहलातून त्यांनं विविध स्पेअर पार्ट्स आणि इलेक्ट्रॉनिक घटकांचा वापर करून सौर सायकल तयार केली. या प्रयोगासाठी त्याच्या कुटुंबीयांनी आवश्यक साहित्य आणि स्पेअर पार्ट्स उपलब्ध करून देत त्याला प्रोत्साहन दिले.
विशेष म्हणजे अब्दुल्लांनी तयार केलेली ही सायकल सौरऊर्जा, बॅटरी आणि पेडलिंग अशा तीन पद्धतींनी चालवता येते. सध्या तो या सायकलचा वापर दररोज शाळेत जाण्यासाठी करतो. दररोज सुमारे 8 किलोमीटरचा प्रवास तो या सायकलने करतो. प्रयोगाच्या चाचणीदरम्यान त्यांनं स्थानिक रस्त्यांवर दिवसभर सायकल चालवून तिची कार्यक्षमताही तपासली.
अब्दुल्ला याला भारताचे माजी राष्ट्रपती व ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्यापासून प्रेरणा मिळते. भविष्यात वैज्ञानिक होण्याचे त्यांचं स्वप्न असून, या सायकलमध्ये पुढे ‘जीपीएस’ सह विविध रोबोटिक वैशिष्ट्ये जोडण्याचा त्याचा मानस आहे. अब्दुल्लांच्या या कल्पक प्रयोगाची दखल घेत शाळेतर्फे त्याचा ट्रॉफी आणि प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.
मोठी प्रयोगशाळा, महागडी उपकरणे किंवा अत्याधुनिक साधने नसतानाही कुतूहल, प्रयोगशीलता आणि शिकण्याची जिद्द असेल तर नवी कल्पना प्रत्यक्षात आणता येते, याचे प्रेरणादायी उदाहरण अब्दुल्ला मंगलगिरी याच्या या प्रयोगातून पाहायला मिळते.



