टीम AM : “काजू खा… बदाम खा… पण शेतकऱ्यांना मदत करा,” अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी देवेंद्र फडणवीस सरकारकडे केली. अंबाजोगाई तालुक्यातील दुष्काळग्रस्त भागाच्या पाहणीदरम्यान रविवारी (दि. 20 सप्टेंबर) त्यांनी दगडवाडी येथील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांची पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या.
यावेळी माध्यमांशी बोलताना रोहित पवार म्हणाले की, मराठवाड्यात दुष्काळाचे विदारक चित्र आहे. सोयाबीनचे पीक 100 टक्के वाया गेले असून खरीपातील इतर पिकांची अवस्थाही गंभीर आहे. संपूर्ण खरीप हंगाम वाया गेला असून पाऊस नसल्याने रब्बी हंगामाचीही आशा राहिलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये तातडीची मदत द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.
तसेच मागील वर्षी जाहीर केल्याप्रमाणे पीकविम्याचे हेक्टरी 17 हजार रुपये, यंदाच्या पीकविम्याची पूर्ण भरपाई, शेतमजूर कुटुंबांना 25 हजार रुपये मदत, चारा छावण्या सुरू करणे आणि विद्यार्थ्यांची संपूर्ण शैक्षणिक शुल्कमाफी करावी. दुष्काळाच्या प्रश्नावर तातडीने विशेष अधिवेशन बोलवावे, अशी मागणीही त्यांनी केली.
5 ऑक्टोबरपर्यंत वाट पाहू नका…!
सरकार दुष्काळ जाहीर करण्याबाबत वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला. “कर्नाटक सरकारने शेतकऱ्यांसाठी योग्य पावले उचलून दुष्काळ जाहीर केला आहे. मात्र, महाराष्ट्र सरकार अजूनही 5 ऑक्टोबरची वाट पाहत आहे. परतीच्या पावसाने परिस्थिती बदलेल आणि सरकारचे पैसे वाचतील, अशी अपेक्षा सरकारला आहे. परंतू, तोपर्यंत शेतकरी देशोधडीला लागलेला असेल, असे ते म्हणाले. त्यामुळे कोणाचीही वाट न पाहता राज्य सरकारने तातडीने दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी त्यांनी केली.
24 सप्टेंबरला बीडमध्ये शेतकऱ्यांचा मोर्चा
बीड जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आणि त्यांचं डोक ठिकाणावर आणण्यासाठी 24 सप्टेंबर रोजी बीड येथे शेतकऱ्यांचा मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती रोहित पवार यांनी दिली. या मोर्चात जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. आमदार रोहित पवार यांच्या दुष्काळी पाहणी दौऱ्यात आमदार संदीप क्षीरसागर, राजेसाहेब देशमुख, माजी आमदार पृथ्वीराज साठे, डॉ. नरेंद्र काळे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, तालुकाध्यक्ष अमर देशमुख शहराध्यक्ष ॲड. ईस्माइल चौधरी यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



