कोरडा दुष्काळ जाहीर करा : बर्दापूर येथे शेतकऱ्यांचं ‘रास्ता रोको’ आंदोलन, वरवटीत वाळलेल्या सोयाबीनची होळी‌…!

टीम AM : अंबाजोगाई तालुक्यात पावसाने दिलेल्या मोठ्या खंडामुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, शेतकऱ्यांवर गंभीर आर्थिक संकट ओढवले आहे. त्यामुळे अंबाजोगाई तालुक्यात तातडीने कोरडा दुष्काळ जाहीर करावा, या प्रमुख मागणीसाठी किसान सभेच्या वतीने बर्दापूर येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनात कॉम्रेड अजय बुरांडे यांच्यासह असंख्य शेतकरी सहभागी झाले होते. पावसाअभावी पिके वाया जाण्याची परिस्थिती निर्माण झाली असून, शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागत असल्याचा मुद्दा आंदोलकांनी उपस्थित केला.

शासनाने तातडीने तालुक्यातील पीक नुकसानीचे पंचनामे करावेत, कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी, पीकविमा व इतर शासकीय योजनांचा लाभ मिळवून द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे शासनाने गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. रास्ता रोकोमुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला होता. आंदोलनस्थळी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

वरवटीत वाळलेल्या सोयाबीनची होळी‌ ; दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

पावसाअभावी वाळलेल्या सोयाबीनची मौजे वरवटी (ता. अंबाजोगाई) येथील शेतकऱ्यांनी होळी करून शासनाचे दुष्काळी परिस्थितीकडे लक्ष वेधले. बीड जिल्हा किसान सभेचे कॉ. अजय बुरांडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आले.

यावेळी शेतकऱ्यांनी ‘कोरडा दुष्काळ जाहीर करा’ तसेच शासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली. पावसाअभावी पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी, अशी मागणी करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here