कोट्यधीश आमदारांचा अनोखा अवतार‌ : पराग शहा भिकारी बनून घाटकोपरच्या रस्त्यावर…!

टीम AM : जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष असा लौकिक असलेल्या भाजपाचे आमदार पराग शाह यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल झाला आहे. पराग शाह हे भिकाऱ्याच्या वेशात मुंबईतल्या घाटकोपरमध्ये फिरताना दिसले. आमदार पराग शाह यांना कुणीही ओळखू शकलं नाही कारण त्यांनी तसंच वेशांतर केलं होतं. पराग शाह यांचे गुरु यांनी त्यांना एक दिवस असा जगून पाहा हे सांगितलं होतं. गुरुंच्या या आदेशाचं पालन करत पाच हजार कोटींची मालमत्ता असलेल्या पराग शाह यांनी एक दिवस भिकाऱ्यासारखा घालवला. याबाबत त्यांनी त्यांचा अनुभवही सांगितला.

एका आमदाराला जो आदर मिळतो, तोच पराग शाह आपल्या पोस्टशिवाय आणि आपली ओळख न दाखवता जेव्हा भिकाऱ्याच्या रुपात रस्त्यावर चालतो आहे तेव्हा कुणीही त्याला ओळख दाखवत नाही. मी वेश बदलला आहे. पण जो मान सन्मान मला आमदार असताना मिळतो. मला भेटण्यासाठी लोक रांग लावतात. पण जेव्हा मी भिकारी बनून त्यांच्या दारात गेलो तेव्हा मला त्यांनी जायला सांगितलं. आयुष्याचं वास्तव काय आहे ? ते पाहण्यासाठी मला गुरुंनी हे करायला सांगितलं होतं. मला कुणी 20 रुपये दिले की बाबा, खाना खा लेना. कुणी समोसावाला होता, त्याने समोसा दिला. मुंबईत मी एक पाहिलं आहे या ठिकाणी कायम लोक एकमेकांना मदत करण्यासाठी उभे राहतात. मी समोसावाल्याला सांगितलं तेव्हा त्याने मला समोसा खायला दिला. लोकांकडे माणुसकी आहे असं पराग शाह म्हणाले.

संजय राऊत यांनी केले कौतुक…!

सगळ्या मंत्र्यांनी आणि आमदारांनी असा प्रयोग केला पाहिजे. पराग शाह यांनी जर हे केलं असेल तर मी त्यांचं कौतुक करतो असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. त्यांच्या धर्मगुरुंनी जे सांगितलं ते त्यांनी स्वीकारलं. मी त्या धर्मगुरुंचंही अभिनंदन करेन. अशा प्रकारे सूचना त्यांनी केल्या आणि त्या त्यांनी पाळल्या. सगळ्यांसाठी ही बाब मार्गदर्शक ठरू शकते असं म्हणत संजय राऊत यांनी शाह यांचं कौतुक केलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here