टीम AM : बीड जिल्ह्यातील 10 तालुक्यांचा दुष्काळी ट्रिगर – 1 मध्ये समावेश करण्यात आला असताना अंबाजोगाई तालुक्याला मात्र त्यातून वगळण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. यंदा पावसाने ओढ दिल्याने खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, अनेक भागांत पिके वाळून गेली आहेत. अशा परिस्थितीत अंबाजोगाई तालुका दुष्काळी ट्रिगर – 1 यादीतून वगळल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
दरम्यान, सोशल मिडीयावर फिरत असलेली दुष्काळी ट्रिगर – 1 ची यादी खरी की खोटी यावर अद्याप खुलासा आला नसला तरी आमदारांनी ही यादी सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केली आहे.
अंबाजोगाई तालुक्यात जूनपासूनच पावसाचे प्रमाण कमी राहिले. त्यानंतर पावसाने मोठा खंड दिल्याने सोयाबीन यांसह विविध पिकांवर परिणाम झाला आहे. अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील पिके अक्षरशः वाळून गेली असून, उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांनी यापूर्वीच ‘कोरडा दुष्काळ जाहीर करा’ अशी मागणी केली आहे. नुकसानीचे पंचनामे करून दुष्काळी उपाययोजनांचा लाभ देण्याची मागणीही करण्यात आली आहे. मात्र, दुष्काळी ट्रिगर – 1 मध्ये अंबाजोगाईचा समावेश न झाल्याने प्रशासनाच्या निकषांवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
‘एकीकडे शेतात पिके वाळून गेली असताना अंबाजोगाई दुष्काळी ट्रिगरमध्ये कशी वगळली ?’ असा सवाल शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात असून, तालुक्याचा तातडीने फेरआढावा घेऊन दुष्काळी उपाययोजनांमध्ये समावेश करावा, अशी मागणी जोर धरत आहे.
अंबाजोगाई वगळल्याने सत्ताधारी लोकप्रतिनिधींवर समाजमाध्यमांत टीका
बीड जिल्ह्यातील 10 तालुके दुष्काळी ट्रिगर – 1 मध्ये समाविष्ट झाले असताना अंबाजोगाई तालुका वगळण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी लोकप्रतिनिधींनी अंबाजोगाईच्या दुष्काळी परिस्थितीकडे लक्ष द्यावे, अशी मागणी समाजमाध्यमांतून होत असून, लोकप्रतिनिधींच्या भूमिकेवरही टीका केली जात आहे. ‘शेतकरी संकटात असताना अंबाजोगाईचा आवाज शासन दरबारी कोण उठवणार ?’ असा सवालही शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे.



