सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ अंबाजोगाईत भव्य मोर्चा : ‘धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या’ च्या घोषणांनी परिसर दणाणला

टीम AM :  ‘नीट’ परीक्षा पेपरफुटी प्रकरणातील दोषींवर तात्काळ व कठोर कारवाई करावी, लाखों विद्यार्थ्यांच्या भविष्याशी सुरू असलेला अन्याय थांबवून त्यांना न्याय मिळावा, या मागणीसाठी दिल्लीतील जंतरमंतर येथे आंदोलन करणारे प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ आज दिनांक 20 जुलै रोजी अंबाजोगाई शहरात भव्य मोर्चा काढण्यात आला.

या मोर्चात विद्यार्थी, युवक, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शहरातील नगरपरिषद परिसरातून मोर्चाला सुरुवात झाली. शहरातील प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत हा मोर्चा उपजिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.

यावेळी आंदोलनकर्त्यांनी “‘तानाशाही नहीं चलेगी’, ‘धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या’, ‘इन्कलाब जिंदाबाद’ अशा जोरदार घोषणा देत परिसर दणाणून सोडला. केंद्र सरकारने ‘नीट’ पेपरफुटी प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याशी होणारा खेळ तातडीने थांबवावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.

मोर्चाच्या शेवटी उपजिल्हाधिकारी यांच्यामार्फत केंद्र सरकारला निवेदन सादर करण्यात आले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी, विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी सुरू असलेल्या सोनम वांगचुक यांच्या लढ्याला आपला संपूर्ण पाठिंबा असल्याचे स्पष्ट करत, विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी कोणत्याही परिस्थितीत तडजोड होऊ देणार नसल्याचा निर्धार व्यक्त केला.

या मोर्चात माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी, माजी आमदार पृथ्वीराज साठे, डॉ. नरेंद्र काळे, राजेसाहेब देशमुख, ॲड. अजय बुरांडे, कॉ. बब्रुवान पोटभरे, प्रा. अरुंधती पाटील, सुदर्शन रापतवार, अमर देशमुख, भीमराव सरवदे, राजेश वाहुळे, धिमंत राष्ट्रपाल, अशोक पालखे, ॲड. माणिक आदमाने, ॲड. इस्माईल गवळी, रमीज सर, ॲड. शिवाजी कांबळे, रामकिसन मस्के, महेंद्र निकाळजे, अनिकेत लोहिया, कालिदास आपेट, अच्चुत गंगणे, दगडू लोमटे, प्रा. शैलजा बरुरे, बुध्दकरण जोगदंड, प्रशांत मस्के, सुहास चंदनशिव, रत्नदीप सरवदे, प्रसन्नजित इंगळे, अरुण बनसोडे यांच्यासह आदींनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here