आमदार मुंदडांच्या दुसऱ्या कार्यकाळातही प्रश्न तेच : उत्तरांची प्रतीक्षा संपेल कधी ? वाचा…!

टीम AM : केज मतदारसंघाच्या आमदार नमिता मुंदडा यांनी विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आरोग्य व शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लक्ष वेधले, ही निश्चितच अभिनंदनीय बाब मानली जात आहे. मात्र, त्यांच्या कारकिर्दीचा हा दुसरा कार्यकाळ असताना मतदारसंघातील प्रलंबित प्रश्नांबाबत अद्याप ठोस प्रगती न झाल्याने युवक व सामान्य जनतेमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

केज मतदारसंघाच्या ‌आमदार नमिता मुंदडा यांनी विधानसभेच्या दोन्ही निवडणुकांदरम्यान मतदारसंघातील युवकांना व जनतेला देण्यात आलेल्या आश्वासनांचे काय झाले ?, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. अंबाजोगाई जिल्हा निर्मितीचा मुद्दा, बुटेनाथ साठवण तलाव प्रकल्प तसेच ‘एमआयडीसी’ ‘टेक्सटाईल पार्क’ यांसारखे अस्मितेचे प्रश्न अद्याप प्रलंबितच असल्याची टीका होत आहे. हे प्रकल्प केव्हा मार्गी लागणार, याबाबत स्पष्ट भूमिका घेण्याची मागणी होत आहे.

दरवर्षी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या वेळी केज मतदारसंघातील जनता मोठ्या अपेक्षेने अधिवेशनाकडे पाहत असते. राज्यातील इतर मतदारसंघांसाठी नव्या योजना व निधीची घोषणा होत असताना केजचे नाव मात्र अर्थसंकल्पात दिसतचं नाही, अशी खंत व्यक्त केली जात आहे. याबाबत आमदारांनी ठोस पावले उचलावीत, अशी मागणी मतदारसंघातून होत आहे.

विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अंबाजोगाई जिल्हा, बुटेनाथ साठवण तलाव आणि ‘एमआयडीसी’ टेक्सटाईल पार्क या मुद्द्यांवर प्रभावीपणे पाठपुरावा करून हे प्रश्न मार्गी लावावेत, अशी अपेक्षा मतदार संघातील जनतेने व्यक्त केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here