टीम AM : अंबाजोगाईतील ग्रामदैवत श्री योगेश्वरी देवी मंदिराला एका निनावी भक्ताकडून तब्बल 1 कोटी रुपयांची देणगी प्राप्त झाली आहे. मंदिराच्या शंभर वर्षांहून अधिक जुन्या मुख्य शिखराच्या जिर्णोद्धारासाठी ही रक्कम अर्पण करण्यात आली असून देणगीदाराने आपली ओळख गुप्त ठेवण्याची विनंती केली आहे.
मंदिराचे ऐतिहासिक शिखर पूर्णतः चुन्याच्या बांधकामात असल्यामुळे कालांतराने ते कमकुवत झाले होते. दुरुस्तीसाठी सुमारे 80 ते 90 लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याची माहिती समोर आल्यानंतर संबंधित भक्ताने तातडीने एक कोटी रुपयांचा धनादेश देवस्थान समितीकडे सुपूर्द केला. ही रक्कम बँकेत जमा झाली असून या आठवड्यात प्रत्यक्ष जिर्णोद्धार कामाला प्रारंभ होणार आहे.
या प्रकल्पासाठी तामिळनाडूतील पारंपरिक कौशल्य असलेल्या कारागिरांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या हस्तकौशल्यातून शिखरावरील नाजूक नक्षीकाम पूर्वीप्रमाणेच भव्य स्वरूपात पुन्हा साकारले जाणार आहे.
या उदार देणगीमुळे अंबाजोगाई शहरासह राज्यातील भाविकांमध्ये समाधान आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून मंदिराच्या ऐतिहासिक वैभवाला नवसंजीवनी मिळणार असल्याची भावना व्यक्त होत आहे.



