टीम AM : अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयात कायमस्वरूपी ‘कार्डिओलॉजिस्ट’ ची नेमणूक करण्यात येणार असल्याची घोषणा वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी विधानपरिषदेत केली.
विधानपरिषदेत आज झालेल्या विशेष चर्चेदरम्यान आमदार विक्रम काळे यांनी येथील ‘स्वाराती’ रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयात हृदयरोग तज्ज्ञांची कायमस्वरूपी नेमणूक नसल्यामुळे रुग्णांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचा मुद्दा उपस्थित केला.
विशेषतः हृदयरुग्णांना तातडीच्या उपचारासाठी इतर जिल्ह्यांत किंवा खासगी रुग्णालयांकडे जावे लागत असल्याची बाब काळे यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली.
यावर उत्तर देताना मंत्री मुश्रीफ यांनी शासन लवकरच आवश्यक पदभरती प्रक्रिया पूर्ण करून कायमस्वरूपी ‘कार्डिओलॉजिस्ट’ नेमणार असल्याचे स्पष्ट केले. यामुळे अंबाजोगाई परिसरातील हृदयरुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. या निर्णयामुळे ‘स्वाराती’ च्या शासकीय वैद्यकीय सेवांना बळकटी मिळणार असून रुग्णांना स्थानिक पातळीवरच दर्जेदार उपचार उपलब्ध होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.



