अजित पवारांचे स्वप्न पुर्ण होणार… ‘स्वाराती’ च्या 1100 खाटांच्या नवीन रुग्णालयाला मिळाली गती, 102 कोटींची तरतूद, वाचा…!

टीम AM : अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे वर्षानुवर्षे अपेक्षित लक्ष दिले गेले नव्हते. मात्र, राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी ही परिस्थिती बदलण्याचा ठाम निर्धार करत रुग्णालयाच्या सर्वांगीण विकासासाठी तब्बल 1000 कोटी रुपयांचा निधी टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून देण्याची ग्वाही अंबाजोगाईतील सभेत दिली होती. त्यांच्या नेतृत्वाखाली ‘स्वाराती’ रुग्णालयाचा चेहरामोहरा बदलून त्याला ‘सुपर स्पेशालिटी’ रुग्णालयाचा दर्जा मिळवून देण्याचा संकल्प करण्यात आला होता. 

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अचानक जाण्यानंतर हा प्रकल्प रखडणार की काय ?, अशी शंका व्यक्त होत होती. मात्र, उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी या प्रकल्पाकडे गांभीर्याने लक्ष देत कामाला गती देण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे ‘स्वाराती’ रुग्णालयाच्या उभारणीचे स्वप्न पुन्हा एकदा साकार होण्याच्या मार्गावर आहे.

दरम्यान, अंबाजोगाई येथे 1100 खाटांचे अत्याधुनिक शासकीय रुग्णालय उभारण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय अजित पवार यांनी घेतला होता. या नवीन रुग्णालयामुळे मराठवाडा व परिसरातील रुग्णांना अधिक दर्जेदार आणि आधुनिक आरोग्यसुविधा उपलब्ध होणार आहेत. अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे, विविध ‘सुपर स्पेशालिटी’ विभाग आणि वाढीव खाटांची क्षमता यांचा यात समावेश असल्याचे सांगितले जाते.

या प्रकल्पासाठी सुमारे 102 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला असून, लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी विधानपरिषदेत नियम 92 अन्वये झालेल्या अर्धा तास चर्चेदरम्यान दिली. त्यामुळे अंबाजोगाईकरां साठी ही मोठी दिलासादायक बातमी ठरली आहे. विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, लवकरच या प्रकल्पाच्या कामाला सुरुवात होणार आहे. ‘स्वाराती’ रुग्णालयाचा दर्जा उंचावल्यास अंबाजोगाईसह बीड जिल्ह्याच्या आरोग्य व्यवस्थेला नवे बळ मिळणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here