बोरुळ तलाव परीसरात नगर परीषद प्रशासनाने बनवले दोन कृत्रिम हौद
अंबाजोगाई : अंबाजोगाई शहर आणि परीसरातील गणेशमुर्ती विसर्जनासाठी पाण्याचे नैसर्गिक साठे उपलब्ध नसल्यामुळे यावर्षी पहिल्यांदाच बोरुळ तलाव परीसरात दोन मोठे कृत्रिम हौद तयार करण्यात आले आहेत. गणेश मुर्तींची प्रतिष्ठापना होण्यापुर्वी पोलीस प्रशासनाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शांतता समितीच्या बैठकीत ज्येष्ठ पत्रकार सुदर्शन रापतवार यांनी सदरील मागणी केली होती.
संपुर्ण महाराष्ट्रात २ सप्टेंबर ते १२ सप्टेंबर या कालावधीत मोठ्या उत्साहाने साजरा होणाऱ्या गणेशोत्सवानंतर गणेशमुर्ती विसर्जनाचा मोठा प्रश्न निर्माण होणार असून या प्रश्नाचा तिढा सुटवण्यासाठी पोलीस-महसुल व नगर परीषद प्रशासनाने गणेश मुर्तीच्या विसर्जनासाठी कृत्रिम पाण्याचे हौद निर्माण करुन उपलब्ध करुन दयावेत अशी मागणी ज्येष्ठ पत्रकार सुदर्शन रापतवार यांनी शांतता समितीच्या बैठकीत केली होती.
१ सप्टेंबर ते १२ सप्टेंबर या कालावधीत शहरात मोहरम व गणेशोत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात येत असल्यामुळे या काळात शांतता व कायदा व्यवस्था सुस्थितीत रहावी म्हणून गणेश मंडळाचे संयोजक, मोहरम उत्सव समितीचे संयोजक व शांतता समितीचे सदस्य यांच्या व्यापक बैठकीचे आयोजन पोलीस स्टेशन परीसरात करण्यात आले होते. या बैठकीस अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख स्वाती भोर, उपविभागीय पोलीस अधिकारी धस, पोलीस निरीक्षक सिध्दार्थ गाडे, महसुल, नगर परीषद, वीज मंडळाचे प्रतिनिधी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या बैठकीत गणेशमुर्ती विसर्जनासंबंधी महत्वपुर्ण सुचना करतांना ज्येष्ठ पत्रकार सुदर्शन रापतवार यांनी यावर्षी अर्धा पावसाळा संपत आला असला तरी पावूसच झाला नसल्यामुळे गणेशमुर्ती विसर्जनाचे पारंपरिक स्त्रोत पाण्याअभावी कोरडेठक्क पडले असून गणेशमुर्तींचे विसर्जन कोठे करावे हा मोठा प्रश्न गणेशभक्तांसमोर निर्माण झाला असल्याचे सांगितले.
अंबाजोगाई शहरातील जवळपास तीस हजार घरात वैयक्तिक आणि सत्तर ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी प्रतिवर्षी गणेश मुर्तींची प्रतिष्ठापना होत असते. गणेशोत्सवाच्या काळात प्रतिष्ठापना करण्यात आलेल्या या गणेशमुर्ती पारंपरिक प्रथेप्रमाणे मोरेवाडी येथील तलाव, बडा हनुमान मंदीराजवळील तलाव, दासोपंत परीसरातील नृसिंह तीर्थ, बोरुळ तलाव आणि परीसरातील लहान-मोठ्या विहिरीमध्ये विधीवत करण्यात येत होते. मात्र यावर्षी पावूसच नसल्यामुळे गणेशमुर्ती विसर्जनाची ही स्त्रोत पाण्याअभावी कोरडीठक्क पडली आहेत. तेंव्हा गणेशमुर्तींचे विधीवत विसर्जन करण्यासाठी पोलीस-महसुल आणि नगर परीषद प्रशासनाने पुढाकार घेवून पाण्याने भरलेला मोठा कृत्रिम हौद गणेशमुर्ती विसर्जनासाठी उपलब्ध करुन द्यावा व गणेशमुर्ती विसर्जनाच्या पावित्र्य प्रथेला गालबोट लागणार नाही याची काळजी घ्यावी असे आवाहन केले होते.

बोरुळ तलाव परीसरात दोन कृत्रिमहौदाची निर्मिती
या बैठकीत करण्यात आलेल्या या महत्वपुर्ण मागणीचे गांभीर्य लक्षात घेवून अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख स्वाती भोर यांनी कृत्रिम हौदासाठी दोन दिवसात स्वतंत्र बैठक घेवून निर्णय घेवू असे आश्वासन दिले होते. त्या आनुषंगाने महसुल प्रशासन, नगर परीषद प्रशासन आणि पोलीस प्रशासनातील अधिका-यांची एक स्वतंत्र बैठक घेवून या मागणीवर शिक्कामोर्तब करण्यात येवून बोरुळ तलाव परीसरात गणेशमुर्तींचे विसर्जन करण्यासाठी नगर परीषद प्रशासनाच्या वतीने २० फुट रूंद आणि ५ फुट खोलीचा एक तर दुसरा त्याही पेक्षा मोठा व खोल अशा दोन मोठे कृत्रिम हौद तयार करण्यात आले आहेत. एका हौदात सार्वजनिक गणेश मंडळाच्या गणेश मुर्तींचे तर दुसऱ्या हौदात घरात बसवण्यात आलेल्या गणेश मुर्तींच्या विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली आहे. या ठिकाणी या कृत्रिम हौदाची आणि या ठिकाणी करण्यात आलेल्या विद्दुत व्यवस्थेची पहाणी अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख स्वाती भोर, उपविभागीय पोलीस अधिकारी धस, नगर परीषदेचे मुख्याधिकारी सुधाकर जगताप, नगर परीषदेतील काँग्रेसचे गटनेते माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी, अभियंता विश्वनाथ लहाने यांनी नुकतीच केली आहे.