मैदानी क्रिडा स्पर्धेतून दर्जेदार खेळाडु निर्माण व्हावेत – राजेसाहेब देशमुख

अंबाजोगाईत तालुकास्तरीय मैदानी क्रिडा स्पर्धेचे उद्घाटन ; 35 शाळा सहभागी

अंबाजोगाई : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना खेळाडू म्हणुन उज्ज्वल कामगिरी करता आली पाहिजे. हे विद्यार्थी देशाचे भावी नागरिक आहेत. या विद्यार्थ्यांचा सर्वांगिण व्यक्तीमत्व विकास होण्याच्या दृष्टीकोणातून व देशाला गुणवंत आणि दर्जेदार खेळाडु मिळावेत या भूमिकेतुन क्रिडा स्पर्धेकडे पाहिले पाहिजे अशा स्पर्धेतून समाजाला दिशा देणारे खेळाडू निर्माण होतात. या खेळाडूंची प्रेरणा घेवून ग्रामीण भागातील विद्यार्थी हा क्रिडा क्षेत्रात मागे राहू नये यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून शालेय क्रिडा स्पर्धांच्या आयोजनासाठी सर्वोतोपरी सहकार्य करण्याची आपली भूमिका राहिली आहे. असे प्रतिपादन बीड जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती राजेसाहेब देशमुख यांनी करून राजेसाहेब देशमुख यांनी स्पर्धेमध्ये टिकायचं असेल तर प्रचंड परिश्रम व मेहनत, व्यायाम, योगासन आवश्यक असल्याचे सांगितले. ते अंबाजोगाईत तालुकास्तरीय मैदानी क्रिडा स्पर्धेचे उद्घाटक म्हणुन बोलत होते.
अंबाजोगाई तालुका मैदानी क्रिडा स्पर्धेचे उद्घाटन राजेसाहेब देशमुख शिक्षण सभापती जिल्हा परिषद बीड यांच्या हस्ते बुधवार,दि.11 सप्टेंबर रोजी करण्यात आले. या स्पर्धा शालेय शिक्षण व क्रिडा विभाग,जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय तथा जिल्हा क्रिडा परिषद बीड, तालुका क्रिडा परिषद अंबाजोगाई व विद्या व्हॅली पब्लिक स्कूल अंबाजोगाई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आल्या. अंबाजोगाई तालुकास्तरीय मैदानी क्रिडा स्पर्धेमध्ये 35 शाळांनी सहभाग घेतला. स्पर्धेचे उद्घाटक म्हणून राजेसाहेब देशमुख हे तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अंबाजोगाई सहकार साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन हणमंतराव मोरे तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती विलासराव सोनवणे, रवि सोनवणे, दत्तामामा मोरे, तालुका क्रिडा संयोजक दत्ता देवकते तसेच विद्या व्हॅली पब्लिक स्कूलचे प्राचार्य अ‍ॅलन स्मिथ, क्रिडा शिक्षक चंद्रकांत साळुंके, मनेश गोरे, विजय बेंडसुरे, श्याम वारकड, नानासाहेब गायके, दिनेश पवार, अंगद केंद्रे, विष्णू केंद्रे यांच्यासह बहुतांश क्रिडा शिक्षक व तालुक्यातील 35 शाळांमधील विद्यार्थी हे स्पर्धक म्हणुन उपस्थित होते. अध्यक्षीय समारोप हणमंतराव मोरे यांनी केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका क्रिडा सहाय्यक दत्ता देवकते यांनी केले. तर सुत्रसंचालन विष्णू सरोदे यांनी करून उपस्थितांचे आभार चंद्रकांत साळुंके यांनी मानले. या क्रिडा स्पर्धेमध्ये 100,200, 400 मीटर धावणे, गोळाफेक,थाळीफेक लांब उडी,उंच उडी इत्यादी क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.