अंबाजोगाई : देवळा गावात गणेश उत्सवानिमित्त संकल्पनेतुन ‘खेळ पैठणीचा’ हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमात विविध स्पर्धांचे आयोजन मंगळवार,दि.10 सप्टेंबर रोजी करण्यात आले होते. सुमारे 300 ते 400 महिला, युवती आदींनी या उपक्रमात सहभाग घेतला.
पावसाळा संपत आला तरी अंबाजोगाई तालुक्यात पुरेसा पाऊस पडलेला नाही.त्यामुळे ग्रामीण भागात उदासीन व दुष्काळी वातावरण आहे.अशा परिस्थितीत महिला आणि मुलींमध्ये सण – उत्सवाच्या काळात उत्साह निर्माण व्हावा. महिलांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा, चुल आणि मुल इथपर्यंतच त्यांना मर्यादित न ठेवता महिलांनी प्रत्येक क्षेत्रात कार्यरत राहून पुढे आले पाहिजे. याच विधायक उद्देशाने व्दारकादास शामकुमार व देवळा श्रमकरी ग्रुपच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
व्दारकादास शामकुमार ग्रुपचे तुकाराम पाटील यांच्या संकल्पनेतुन सदर उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमात देवळा, अकोला, सारसा या गावातील अंगणवाडी सेविका, बचतगटांच्या महिला कार्यकर्त्या,विद्यार्थीनी अशा एकुण मिळून 300 ते 400 महिलांनी उत्स्फुर्त सहभाग नोंदवला होता. संगीत खुर्ची, तळ्यात-मळ्यात (उड्या मारणे), हवा भरून फुगा फोडणे, उखाणे म्हणने, खो-खो या मैदानी तसेच मनोरंजनात्मक आदी स्पर्धेतील सहभागी स्पर्धकांची साखळी पध्दतीने निवड करण्यात आली. लातूर येथील संचाने स्पर्धेचे संयोजन केले. देवळा गावच्या सरपंच व अन्य दोन ज्येष्ठांनी स्पर्धा परीक्षक म्हणून काम पाहीले. या स्पर्धेत कल्पना अर्जुन गुरखेल यांनी प्रथम क्रमांक पटकावला तर सुलभा बाळासाहेब आगळे द्वितीय आणि महानंदा नरसिंग पवार यांनी तृतीय क्रमांक पटकावला. विजेत्या महिलांना एक पैठणी व प्रमाणपत्र ही पारितोषिके तर सर्व सहभागी महिला स्पर्धकांना शंभर रूपयांचा कॅश क्रेडीट चेक देण्यात आले. यावेळी देवळा गावच्या सरपंच वत्सलाबाई यादव, उपसरपंच ललिताबाई पवार, मंगलताई पवार, पर्वतीबाई जाधव, योगीताताई खामकर, अॅड.सतीश भिसे, डिएस ग्रुपचे पद्माकर सावणे,देवळा श्रमकरी ग्रुपचे अशोक खामकर, महादेव कदम,रवींद्र देवरवाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
स्पर्धेच्या ठिकाणी अमोल सगट यांनी काढलेली ‘बेटी बचाव, बेटी पढाव’ व ‘पर्यावरण रक्षणाचा संदेश’ देणारी रांगोळी सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. महिला भगिनींनी या उपक्रमाचे स्वागत केले. यापुढे ही असे उपक्रम महिलांसाठी आयोजित करावेत असे अनेक महिलांनी बोलताना सांगितले आणि व्दारकादास शामकुमार यांचेही आभार मानले. या स्पर्धेचे नियोजन देवळा श्रमकरी ग्रुपच्या वतीने करण्यात आले होते.